*चंद्रपुरात इलेक्ट्रॉनिक ऑटोमोबाईल्स प्लांट व टेक्स्टाईल पार्क उभारावा : खासदार बाळू धानोरकर*
*खासदार बाळू धानोरकर यांनी घेतली खासदार शरदचंद्र पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट*
चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात नवीन उद्योग आणण्यासाठी खासदार बाळू धानोरकर सातत्याने प्रयत्न करीत आहेत. इलेक्ट्रिक ऑटोमोबाइल प्लांट व टेक्स्टाईल पार्कसाठी करीत असलेल्या त्यांच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. आज मुंबई येथे खासदार शरद पवार, उद्योग मंत्री सुभाष देसाई, आमदार प्रतिभा धानोरकर, विदर्भ एमआयडीसी अध्यक्ष मधुसूदन रुंगठा यांची उपस्थिती होती. जिल्ह्यात उद्योगांच्या असलेल्या निकडीबाबत खासदार बाळू धानोरकर यांच्या पुढाकारातून ही बैठक झाली.
जिल्ह्यात रोजगाराची निर्मिती होण्यासाठी उद्योगधंद्यांची नितांत आवश्यकता आहे. आर्थिक सुबत्ता आल्याखेरीज या भागाचा सर्वांगिन विकास होणे कठीण आहे. या अनुषंगाने गेल्या वर्षभरापासून खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर हे दाम्पत्य जिल्ह्यात नवे उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. याआधी केंद्र व राज्य स्तरावरील मंत्र्यांशी सातत्याने पाठपुरावा केला. आज खासदार शरद पवार यांच्या मुख्य उपस्थित बैठक पार पडली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार यांचेकडे पाठपुरावा चालवीत केंद्रीय मंत्री नारायण राणे, पियुष गोयल व राज्यातील उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे कडे सातत्याने पत्राचार व बैठक घेऊन प्रयत्न केले. याआधी खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्ह्यात टेक्सटाईल पार्क उभारण्याची मागणी लोकसभेत देखील केली होती. खासदार बाळू धानोरकर यांच्या प्रयत्नांना यश येताना दिसत असून आज खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत अत्यंत महत्वाची बैठक पार पडली आहे.
शरद पवार यांनी राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना चंद्रपुरात इलेक्ट्रॉनिक ऑटोमोबाईल्स प्लांट उभारण्याबाबत आवश्यकतांची तपासणी करण्याची सूचना केली. तसेच जिल्ह्यात उद्योग निर्मितीत राज्य सरकारकडून संपूर्ण सहकार्य करा असे सांगितले. तर टेक्सटाईल पार्क संदर्भातील मागणीबाबत दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांचे समवेत बैठक घेण्याचे ठरले आहे.
चंद्रपूर, वणी, आर्णी लोकसभा क्षेत्र आदिवासी बहुल आहे. या भागात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. त्यासोबतच धान, सोयाबीन, ही पिके प्राधान्याने घेतली जातात. येथील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना देखील टेक्स्टाईल पार्क मुळे सुगीचे दिवस येऊ शकतात. तसेच इलेक्ट्रॉनिक ऑटोमोबाईल प्लांटच्या माध्यमातून युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो. दरम्यान खासदार बाळू धानोरकर यांनी खासदार शरदचंद्र पवार यांच्या मुख्य उपस्थितीत घेतलेल्या बैठकीमुळे जिल्ह्यात नवे उद्योग निर्माण होण्याच्या हालचालींना गती मिळाली आहे.
Comments
Post a Comment