आंतरजातीय विवाहामुळे सामाजिक सौहार्दय टीकून जातीपातीच्या भींती तुटतील - रविंद्र शिंदे

आंतरजातीय विवाहामुळे सामाजिक सौहार्दय टीकून जातीपातीच्या भींती तुटतील - रविंद्र शिंदे 

स्व.श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट व महात्मा गांधी तंटामुक्त समिती मांगली (रै.) च्या संयुक्त विद्यमाने आंतरजातीय विवाह सोहळा संपन्न 

भद्रावती : 
            आपल्या देशात काही दशकांपूर्वी आंतरजातीय विवाह म्हणजे समाजाच्या प्रथांविरोधात गुन्हा केल्यासारखे पाहिले जायचे. आज काही प्रमाणावर परिस्थिती बदलली असली तरी जातीयवादी व्यवस्था समाज पोखरत आहे. समाजातील लोक या आंतरजातीय विवाहाकडे चुकीच्या नजरेतून पाहत असल्याचे आढळून येते. दरवर्षी हजारो तरुण तरुणींना आंतरजातीय विवाह करण्यास खूप त्रास होतो. त्यामुळेच आंतरजातीय विवाह करण्यासाठी शासनाकडून विविध योजनांचा लाभ मिळवून दिल्या जातो. पर्यायस्वरुप आंतरजातीय विवाहामुळे सामाजिक सौहार्दय टीकून जातीपातीच्या भींती तुटतील असे मार्गदर्शन स्व.श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रवि शिंदे यांनी केले. निमीत्त होते तालुक्यातील मांगली (रै.) येथील आंतरजातीय विवाह समारंभाचे.
        तालुक्यातील मांगली (रै.) येथील प्रशांत बबन गाठले व रेवती नामदेव सोनूलकर यांना विवाह बंधनात बंधायचे होते परंतु आंतरजातीय विवाह असल्याने त्यांना अनेक अडचणी निर्माण होत असल्याने त्यांनी स्व.श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत सुरू असलेल्या विवाह नोंदणी मध्ये दि. २४ जानेवारीला नोंदणी केली व दोघांचेही विनंती अर्ज सादर केले. त्या अर्जाची दखल घेत ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी मांगली (रै.) येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुरज चौधरी यांच्याशी दि. २ फेब्रुवारीला पत्राद्वारे संपर्क साधला व त्यांना याबाबतीत संपुर्ण माहिती देऊन सदर विवाहसंबंधी तारीख व वेळ कळविण्याबाबत विनंती केली असता त्या अनुषंगाने महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुरज चौधरी यांनी सदर विवाह सोहळा दि. ६ फेब्रुवारी रोज रविवार ला सकाळी ११ वा. मांगली (रै.) येथील सांस्कृतिक भवनात आयोजित करीत असल्याबाबत दि. ४ फेब्रुवारीच्या पत्रानुसार कळविले व त्या अनुषंगाने स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट व तंटामुक्त समितीच्या संयुक्त विद्यमाने आज दि. ६ ला त्यांचा विवाह सोहळा पार पाडण्यात आला. प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी नवविवाहित जोडप्याला त्यांच्या पुढील आयुष्याकरिता शुभेच्छा दिल्या व ट्रस्ट च्या माध्यमातून काही आर्थिक मदत केली.
           सदर विवाह सोहळ्यास स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, सुरज चौधरी अध्यक्ष महात्मा गांधी तंटामुक्त समिती, सरपंच धनराज पायघन, विद्याताई कांबळे माजी सभापती पंचायत समिती भद्रावती, सतीश कांबळे, नीलकंठ लेडांगे, अध्यक्ष सेवा सहकारी संस्था, मंगेश ठेंगळे सामाजिक कार्यकर्ता व गावातील नागरिक यांची उपस्थिती होती.
     या प्रसंगी बोलताना रवींद्र शिंदे यांनी ट्रस्ट मार्फत चालत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.

Comments