बाबा आमटे हेच माझे श्रद्धास्थान--- न्यायमूर्ती विकास सिरपूरकर जिवन गौरव पुरस्कार सोहळ्या निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रतिपादन

बाबा आमटे हेच माझे श्रद्धास्थान--- न्यायमूर्ती विकास सिरपूरकर

 वरोरा दिनांक 3 एप्रिल 

श्रद्धेय बाबा आमटे यांनी माणसाच्या उत्थानासाठी  केलेले कार्य हे फार मोठे आहे. मी वरोरा शहरात माझ्या वकीली ला आरंभ केला.  माझ्या वडिलांनी मला एकदा बाबा आमटे यांचे कडे नेले, तेव्हा बाबांनी माझ्या वडिलांना पुत्रमोह सोड आणि याला नागपूर ला पाठव असा सल्ला दिला. एक दिवस हा नक्की हायकोर्ट चा न्यायाधीश होईल असा विश्वास बाबांनी त्यावेळेस व्यक्त केला,  आणि न्यायमूर्ती पदाची शपथ घेईपर्यंत बाबांचे ते शब्द माझ्या कानात सतत रुंजी घालत होते. श्रध्देय बाबा आमटे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विलक्षण प्रभाव माझ्या जीवनात शेवटपर्यंत राहिला असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश विकास सिरपूरकर यांनी केले.  स्थानिक गांधी उद्यान योग मंडळ आणि गुढीपाडवा उत्सव समितीच्या वतीने आयोजित वरोरा रत्न जीवन गौरव पुरस्कार सोहळा आंबेडकर चौकात आयोजित करण्यात आला होता, याप्रसंगी ते बोलत होते.

 याप्रसंगी व्यासपीठावर गांधी उद्यान योग मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र नेमाडे, कार्यक्रमाचे उद्घाटक प्रा मधुकर उपलेंचवार ,प्रमुख पाहुण्या कुमकुम सिरपुरकर ,योगाचार्य प्रकाश संचेती आणि गुढीपाडवा आयोजन समितीचे अध्यक्ष नितेश जयस्वाल यांची उपस्थिती होती

 आयोजन समितीच्यावतीने पहिला वरोरा रत्न जीवन गौरव पुरस्कार न्यायमूर्ती सिरपूरकर यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी वरोऱ्यातील  बालपणीच्या आठवणी न्यायमूर्ती सिरपूरकर यांनी श्रोत्यांच्या पुढे मांडून त्यांना उजाळा दिला. जगात माणुसकी सर्वश्रेष्ठ असते असे सांगत ते म्हणाले की सर्व धर्म समभाव हेच जीवनाचे ब्रीद असले पाहिजे. चांगल्या गुणांना वाव देणे हे वरोडा शहराचे वैशिष्ट्य आहे. माझ्या जीवनात मी कधीही जातीभेद पाळला नाही. सर्व जाती आणि पंथाचे  लोक हे माझे मित्र होते आणि हे मित्रत्व मी आजही जपून ठेवले आहे. महाराष्ट्र भूषण रा कृ पाटील ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा सा कन्नमवार हे वरोऱ्याचे असल्याचा मला अभिमान वाटतो. या शहराने माझ्या महत्त्वाकांक्षांना ना खतपाणी घातलं आणि मोठं केलं याचा मला अभिमान आहे असे गौरवोद्गार त्यांनी या प्रसंगी काढले.
 याप्रसंगी प्रास्ताविकातून नरेंद्र नेमाडे यांनी गांधी उद्यान योग मंडळाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला न्यायमूर्ती शिरपूरकर यांचे स्वागत भव्य रोषणाईने करण्यात आले. सन्मानचिन्ह ,शाल, श्रीफळ आणि मानपत्र देऊन त्यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्राचे वाचन प्रा राधा सवाने यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ प्रशांत खुळे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता सुरभी ढोमणे यांनी गायलेल्या वंदेमातरमने झाली .वरोरा शहरातील गणमान्य व्यक्ती यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती याप्रसंगी होती. यानंतर संगीत संध्या चा आस्वाद रसिकांनी घेतला


 

Comments