वरोरा दिनांक 15 मे
प्रशांत खूळे
## उन्हाळी शिबिराच्या समारोप प्रसंगी प्रतिपादन
## जी एम आर तर्फे प्रतिभावंतांचा सत्कार
विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना आपल्या आवडीनिवडी जपाव्या . विविध क्षेत्रात करिअर करताना आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे आणि त्यात मन लावून काम केल्यास यशाचे शिखर गाठता येते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण संस्थांनी सर्वतोपरी प्रयत्न केल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थी जीवनात मोठी झेप घेऊ शकतात असे प्रतिपादन जी. एम .आर. वीज कंपनीचे मुख्य प्रबंधक धनंजय देशपांडे यांनी केले. लोक शिक्षण संस्थेद्वारा आयोजित उन्हाळी व्यक्तिमत्व विकास शिबिराच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
या प्रसंगी व्यासपीठावर लोक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा श्रीकांत पाटील आणि कार्यवाह श्रीकृष्ण घड्याळपाटील यांची उपस्थिती होती.
जी एम आर तर्फे चालविल्या जाणाऱ्या प्रतिभा वाचनालयातील अद्ययावत संगणक कक्षाचे आणि विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
आपल्या प्रतिपादनात प्रा श्रीकांत पाटील यांनी प्रतिभा वाचनालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करीत, विद्यार्थ्यांनी आता स्पर्धा परीक्षांमध्ये अधिकाधिक सहभागी होऊन यश मिळविणे गरजेचे झाले आहे असे सांगत, प्रतिभा केंद्राचा उपयोग ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी करावा असे आवाहन केले. तर श्रीकृष्ण घड्याळपाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता लोक शिक्षण संस्था कटिबद्ध असून यापुढे नव उपक्रमाला प्राधान्य देणार असल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी शिबिरार्थींनी प्रज्ञावर्धन स्तोत्र, प्राणायाम, आसने, संस्कृत कथा, क्रीडा नृत्य, घोष रचना, कलाविष्कार आणि योग नृत्याचे प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. प्रतिभा वाचनालयातील विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविलेल्या सोळा विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच धनंजय देशपांडे यांचा सत्कार संस्थेच्या वतीने प्रा श्रीकांत पाटील आणि घड्याळपाटील यांनी शॉल ,श्रीफळ आणि ग्रंथ भेट देऊन केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य जयंत बंडावर यांनी तर संचालन रवींद्र पवार व डॉ प्रशांत खुळे यांनी केले. प्रा उत्तम देऊळकर यांनी अहवाल वाचन केले. जीएमआर कंपनीचे वरिष्ठ अधिकारी विनोद पुसदकर, सुनील विश्वकर्मा ,श्री मुरली ,पालक, शिक्षक आणि मान्यवरांची उपस्थिती याप्रसंगी मोठ्या प्रमाणात होती
Comments
Post a Comment