खतांमधील रासायनिक द्रवाचा विपरीत परिणाम झालेल्या मुलाचा अखेर मृत्यू

खतांमधील रासायनिक द्रवाचा विपरीत परिणाम झालेल्या मुलाचा अखेर मृत्यू

वरोरा 
* कंपनीवर फोजदारी कारवाईची शक्यता
वरोरा : शेत पिकाच्या वाढी करिता शिवा ग्लोबल ऍग्रो इंडसस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने बाजारात आणलेल्या त्रिशूल ब्रँड  शिवा गोल्ड या खताचा प्रकृतीवर विपरीत परिणाम झाल्याने रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रितेश सतीश चौधरी या १८ वर्षीय शेतमजूर मुलाचा आज बुधवार दि ६ जुलै रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. 
यामुळे खत निर्माण करणाऱ्या सदर कंपनीवर फोजदारी कारवाई होण्याची शक्यता आहे.
शिवा ग्लोबल ऍग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड ढाकणी तालुका लोहा जिल्हा नांदेड या कंपनीने त्रिशुल ब्रँडचे शिवा गोल्ड हे खत बाजारात आणले आहे. सदर खत हे सर्व प्रकारच्या पिकांकरिता प्रभावी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या खतात फॉस्फरस १६ टक्के, डब्ल्यू एस १४.५ टक्के,बोरॉन ०.२ टक्के,झिंक ०.५ टक्के आणि सल्फर ११ टक्के ही रसायने असल्याचे नमूद करण्यात आले आहे. हे खत पिकांसाठी उत्तम असल्याचा दावा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी आपल्या प्रसिद्धी पत्रकातून आणि शेतकऱ्यांशी संवाद साधून केल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात या खताची खरेदी केली व ते पिकांना द्यायला सुरुवात केली. परंतु याचे विपरीत परिणाम शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रकृतीवर दिसायला सुरुवात झाल्याने आणि शेकडो शेतकरी - शेतमजूर आजारी पडल्याने शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली . तालुक्यातील वंधली आणि जळका या भागातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात यात समावेश आहे. आजारी शेतकऱ्यांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक होती. त्यातील रितेश सतीश चौधरी १८ वर्ष राहणार वंधली  हा वर्धा जिल्ह्यातील सावंगी येथे दहा दिवसा पासून उपचार घेत होता. दिवसेंदिवस त्याची प्रकृती खालावत जाऊन मंगळवारी रात्री ते बुधवार पहाटे दरम्यान त्याचा मृत्यू झाला. तो आई वडीलांना एकुलता होता. शवविच्छेदन केल्यानंतर बुधवारी त्याचा मृतदेह वंधली येथे आणण्यात आला. व त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात गावकरी उपस्थित होते. सदर मुलाच्या मृत्य करिता संबंधित खत कंपनी दोषी असल्याचा आरोप होत असून कंपनीवर फोजदारी कारवाईची मागणी केली जात आहे.

Comments