*भद्रावतीची साची जिवने ठरली मिस टीन इंडिया*
भद्रावती:- येथील नवीन सुमठाणा वार्डातील रहिवासी साची चंदू जिवने ही नुकत्याच दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय मिस टीन इंडिया टॅलेंटेड २०२२ या स्पर्धेत पहिल्या पाच विजयी स्पर्धकांत स्थान प्राप्त करून यशस्वी ठरली आहे.
साची जिवने ही सध्या एम.जी.एम.विद्यापीठ औरंगाबाद येथे इलेक्ट्रॉनिक मिडिया या विषयात बी.ए.प्रथम वर्षाला शिकत आहे. तिचे वडील ऑटो चालक असून आई आयुध निर्माणीत चार्जमन आहे. ॲली क्लब नवी दिल्ली तर्फे 'मिस ॲन्ड मिस्टर टीन इंडिया-२०२२' या स्पर्धेचे आयोजन दिल्ली येथील सेवन सीज हाॅटेलमध्ये करण्यात आले होते. मागील २४ वर्षांपासून ही संस्था या स्पर्धेचे आयोजन करत आहे. यंदाच्या स्पर्धेत संपूर्ण देशातील विविध प्रांतातील ७० स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यात पहिल्या पाच विजयी स्पर्धकांत स्थान प्राप्त करण्याचा मान साचीला मिळाला. यावेळी अभिनेता आयुब खान आणि अभिनेत्री पूजा बॅनर्जी यांच्या हस्ते साचीला पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सदर स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी साचीने ऑडिसन दिले होते. त्यात २००० स्पर्धकांमध्ये तिची निवड करण्यात आली होती. स्पर्धेत परीक्षक म्हणून यावेळी संजय कपूर, तुषार कपूर, मनोज तिवारी, पूजा बॅनर्जी, तनाज इराणी, आयुब खान, शाहबाज खान इत्यादी सेलिब्रिटींची उपस्थिती होती.
विशेष म्हणजे दि.६ ऑगस्ट रोजी साचीच्या वडिलांचा अपघात झाला होता. ते रुग्णालयात उपचार घेत होते. त्यामुळे ती स्पर्धेत सहभागी व्हायला तयार नव्हती. परंतु वडिलांनी तिला प्रोत्साहन दिले. त्यामुळे ती तयार झाली आणि तिला यश प्राप्त झाले. तिचे नृत्य शिक्षक सागर मामिडवार यांचेही तिला प्रोत्साहन आणि मार्गदर्शन लाभले. तिच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Comments
Post a Comment