राष्ट्रीय स्तरावरील पॉवर लिफ्टिग चॅम्पियनशिप, कबड्डी चषक, दिव्यांगाना सायकल वाटप व भव्य रक्तदान शिबिर
स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट, चंद्रपूर द्वारा आयोजन
भद्रावती :
स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट, चंद्रपूर द्वारा वरोरा-भद्रावती तालुक्यातील जनतेकरीता विविध लोकोपयोगी सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
सदर कार्यक्रम हे दिनांक १३ ऑक्टोबरपासून १६ ऑक्टोबर पर्यंत स्थानिक श्री मंगल कार्यालय येथे राबविल्या जात आहेत.
या कार्यक्रमांमध्ये नॅशनल सिनियर अँड मास्टर्स क्लासिक पॉवर लिफ्टिग चॅम्पियनशिप - २०२२, माजी आमदार कै. म. ना. पावडे भव्य कबड्डी चषक, भव्य रक्तदान शिबिर, दिव्यांगासाठी सायकल वाटप आदींचा समावेश आहे.
नॅशनल सिनियर अँड मास्टर्स क्लासिक पॉवर लिफ्टिग चॅम्पियनशिप - २०२२ मध्ये देशभरातून ५५० खेळाडू सहभागी होत आहेत. यातील काही खेळाडू हे आयएएस, आयपीएस पदावर असलेले खेळाडू आहेत. उल्लेखनीय म्हणजे पॉवर लिफ्टिंग इंडिया चे अध्यक्ष निवृत्त आयएएस अधिकारी राजेश तिवारी, सचिव अर्जुन अवार्डी पी.जे. जोषेफ, विदर्भ पॉवर लीफ्टींग असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश पाचपोर, सचिव सचिन माथणे, जिल्हा शक्तित्तोलन असोसिएशन, चंद्रपूर चे उपाध्यक्ष रवींद्र गुरूनुले यांच्या नेतृत्वात हे खेळाडू सहभागी होत आहे. या चॅम्पियनशिपमधून विजेता ठरणाऱ्या खेळाडूची दुबई येथील आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप करीता निवड होणार आहे. माजी आमदार कै. म. ना. पावडे हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संस्थापक होते. त्यांनी या जिल्ह्यात सहकार क्षेत्राचा पाया घातला. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ भव्य कबड्डी चषक घेण्यात येत आहे. या स्पर्धेकरीता वरोरा व भद्रावती तालुक्यातून अनेक संघ सहभागी होत आहेत. या दोन्ही स्पर्धा सुरू होण्याअगोदर शहरातील मुख्य मार्गावरून खेळाडूंची "प्रेरणा रैली" निघणार आहे. वरोरा येथे श्रद्धेय बाबा आमटे आरोग्य अभियाना अंतर्गत दिव्यांग बांधवांना सायकल वाटप कार्यक्रम होणार आहे. तर भद्रावती येथे रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे.
या सर्व कार्यक्रमांचे उद्घाटन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे करणार असून अध्यक्ष प्रसिध्द विधीज्ञ तथा धनोजे कुणबी समाजाचे अध्यक्ष एड. पुरुषोत्तम एम. सातपुते असणार आहे. प्रमुख पाहुणे स्वरुपात उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी, विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे, एड. विजय मोगरे, तहसीलदार डॉ. अनिकेत सोनावणे, तहसीलदार श्रीमती रोशन मकवाने, सामाजिक कार्यकर्ते तथा प्रसिध्द विधीज्ञ एड. भूपेंद्र रायपूरे, एड. गजानन बोढाले, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक डॉ. विजय देवतळे, भद्रावती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य डॉ. विवेक शिंदे आदी उपस्थित राहणार आहेत.
कोरोना व अतिवृष्टी या आपत्तीतून निघाल्यानंतर समाजात पुन्हा एकदा स्फूर्ती व चैतन्य जागावे, जगण्याला बळ मिळावं व माणूस म्हणून आयुष्य जगण्याची कला अविरत व्हावी, या सदहेतूने क्रीडा स्पर्धा, दिव्यांगांना सायकल वाटप, रक्तदान शिबीर, सांस्कृतिक महोत्सव, असे विविध सामाजिक उपक्रम वरोरा व भद्रावती तालुक्यातील नागरीकांकरीता आयोजित केले असल्याचे ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रवि शिंदे यांनी यावेळी सांगितले.
या निमित्ताने कायद्याच्या चौकटीत राहून युवकांनी कसे काम करावे, याबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा वरोरा, भद्रावती तालुक्यातील जनतेनी लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे कार्यवाहक धनराज पाटील आस्वले, दत्ता बोरेकर, भास्कर ताजने, खेमराज कुरेकर, ज्ञानेश्वर डुकरे, रोहन कुटेमाटे, विश्वास कोंगरे, तथा आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment