झोपेतच आला हृदयविकाराचा झटका
*मरोपरान्त केले देहदान*
वरोडा : श्याम ठेंगडी
महाराष्ट्र विधानसभेचे माजी उपसभापती , राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विवेकानंद ज्ञानपीठ या शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष एडवोकेट मोरेश्वर टेंभुर्डे यांचे आज 22 जानेवारी रोज रविवारला पहाटेच्या सुमारास दुःखद निधन झाले मृत्यूसमयी ते ८५ वर्षाचे होते.
ते झोपेतच असतांना त्यांना आज पहाटे ५च्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या बाजूला त्यांचा मुलगा अमन हा झोपला होता. सकाळी वडील झोपेतून न उठल्याने पाहीले असता ते त्याचे प्राणज्योत मालवली होती.
अॅड. टेमूर्डे यांच्या इच्छेनुसार मृत्यूपश्चात देहदानासाठी त्याचे पार्थिव चंद्रपूर शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयात रवाना करण्यात आले.
त्यांच्या मृत्यूची वार्ता शहरात पसरताच त्यांच्या निवासस्थानी चहात्यांनी गर्दी केली. आनंदवनचे डॉक्टर विकास आमटे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अंतिम दर्शन घेतले. देहदानासाठी चंद्रपूरला रवाना होण्यापूर्वी त्यांच्या पार्थिवाची शहरातील प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा काढण्यात आली. भद्रावती वरोरा विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर, रवी शिंदे यांचे सह अनेक मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले व त्या नंतर सकाळी त्यांचे पार्थिव चंद्रपूरला रवाना करण्यात आले.
एडवोकेट मोरेश्वर टेंभुर्डे हे भाजप सेना युतीच्या काळात महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी उपसभापती होते .एक अभ्यासू ,तत्ववादी ,विचाराशी तडजोड न करणारा व शेतकऱ्यांचे चाहते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचे पश्चात पत्नी, जयंत व अमन ही दोन मुले व एक मुलगी व बराच मोठा परिवार आहे.
तालुक्यातील मोहबाळा हे मुळगाव असलेले एडवोकेट टेंभुर्डे यांनी स्वतः गरिबीत व प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतले .कधी अनवाणी ,कधी ओले चिंब होत तर कधी उपाशी किंवा अर्ध पोटी राहत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आणि अशी स्थिती कोणावरही येऊ नये यासाठी त्यांनी 1978 मध्ये विवेकानंद ज्ञानपीठ या संस्थेची स्थापना केली.प्रगती करायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही अशी त्यांची धारणा होती.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा फुले ,गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज ,योगी अरविंद घोष आणि माताजींच्या विचारांचा त्यांचेवर प्रभाव होता.
येथील नेताजी शाळेतून शिक्षण घेऊन त्यांनी वरोडा येथील कर्मवीर विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून काम केले .परंतु संस्थेशी काही मतभेद झाल्याने त्यांनी ती नोकरी सोडली. व 2 ऑक्टोबर 1968 पासून येथील न्यायालयात वकिली सुरू केली.
समाज सुधारणा करायची असेल तर राजकीय सत्ता असली पाहिजे याची त्यांना जाणीव झाली. म्हणून दोनदा खासदार व वरोडा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातून चारदा आमदार पदाची त्यांनी निवडणूक लढवली. पुढे1984 मध्ये शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांच्या संपर्कात ते आले व त्यांनी संघटनेचे सरसेनापती या पदापर्यंत झेप घेतली.वरोडा- भद्रावती विधानसभा क्षेत्रातून 1985 मध्ये ते पहिल्यांदा आमदार मिळून निवडून आले.याच क्षेत्रातून 1990 मध्ये पुन्हा त्यांना विजयश्री प्राप्त झाली व ते आमदार बनले आणि 19 जुलै 1991 रोजी त्यांची विधानसभेचे उपसभापती म्हणून निवड झाली.
आपले जीवन नेहमी दुसऱ्याच्या कामी यावे असे त्यांना वाटत असल्याने त्यांनी मरणोपरान्त केलेला देहदानाचा संकल्प नव्या पिढीला वैचारिक दिशा दाखवणारा आहे.
दिनांक 22-01-2023 रोजी पहाटे 4 वाजता मा. श्री. मोरेश्वररावजी टेमूर्डे साहेब माजी विधानसभा उपाध्यक्ष यांचे दुःखद निधन झाले त्यानिमित्ताने आज दिनांक 23-01-2023 रोजी सायंकाळी ठीक 7.00 वाजता गांधी चौक वरोरा येथे सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली आहे तरी आपण सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.
Comments
Post a Comment