भद्रावती : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा येत्या २१ फेब्रुवारी २०२३ रोज मंगळवारपासून सुरू होत आहे. परीक्षाविषयक कामकाज व वर्गातील पर्यवेक्षण सुरळीत चालण्यासंदर्भात नुकतीच विवेकानंद महाविद्यालयात प्राध्यापकांची सभा घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे होते. याप्रसंगी महाविद्यालयातील केंद्र संचालक प्रा. रामकृष्ण मालेकर व सहकेंद्रसंचालक प्रा.खोजराज कापगते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, "यावर्षी परीक्षेसाठी नियमावली कडक करण्यात आलेली आहे. ठीक ११ वाजता परीक्षार्थींना प्रश्नपत्रिका वाटप होईल. त्यानंतर परीक्षार्थींना परीक्षास्थळी प्रवेश मिळणार नाही. तरी सर्व विद्यार्थ्यांनी पेपरच्या पूर्वी १०.३० वाजता परीक्षा केंद्रावर पोहोचावे. इंग्रजी विषयाला ए,बी,सी,डी अशी पूर्वीप्रमाणे गट विभागणी राहणार नाही. सर्वच परीक्षार्थींना पेपर समान राहील. पेपर लिहिण्याची वेळ ही दुपारी २ वाजून १० मिनिटांपर्यंत असेल. परीक्षार्थींना आणि पर्यवेक्षकांना वर्गात मोबाईल, टॅबलेट व कॅल्क्युलेटर जवळ बाळगता येणार नाही. परीक्षार्थींनी निळ्या किंवा काळ्या रंगाच्या बालपेनने लेखन करावे."अशा सूचना देण्यात आल्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमाटे यांनी परीक्षा सुरळीत व नियमानुसार होण्यासाठी दिलेल्या योग्य त्या सूचनांचे सर्व पर्यवेक्षकांनी काटेकोर पालन करावे. कोणत्याही प्रकारच्या तक्रारी येणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना केल्या.सभेचे आभारप्रदर्शन प्रा. नरेंद्र लांबट यांनी केले. यावेळी या परीक्षेत पर्यवेक्षण करणाऱ्या संभाव्य वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांची उपस्थित होते.
Comments
Post a Comment