डोजर चालकाच्या चुकीमुळे एकाचा मृत्यू: चालबर्डी येथील घटना


मातीखाली दबून एकाचा मृत्यू, चालबर्डी येथील घटना

माजरी प्रतिनिधी - १९.०६.२३

माजरी -  कर्नाटका एमटा कोळसा खाणीतून निघालेला ओवरबर्डनच्या मातीत दाबून एकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री ९:३० च्या सुमारास भद्रावती माजरी मार्गावर चालबर्डी फाटा येथे घडली. 
अनिल विठ्ठल मत्ते (३८) राहणार चालबर्डी अशी मयत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, विजय रामदास मत्ते हा चालबर्डी येथील रहिवासी असून आपल्या शेतातील खाजगी कामाकरिता एमटा खाणीतून निघालेल्या ओवरबर्डनची माती आपल्या शेतात टाकण्याकरिता नेत असताना चालबर्डी फाट्यावर गावात हायवा ट्रक जात नसल्याकारणाने सदर माती चालबर्डी फाट्यावरच डंप केली होती. आणि ती माती ट्रॅक्टर द्वारे वाहतूक करणार होते. दरम्यान ती माती रस्त्यावर टाकल्यामुळे रस्ता बंद झाला होता.  त्यामुळे चालबर्डीकडे जाणाऱ्या नागरिकांना ये -जा करण्यासाठी अडथळा निर्माण होत होता. दरम्यान अनिल मत्ते व इतर चार व्यक्ती कोंढा येथून चालबर्डी फाट्यावर आले असता, रस्त्यावर मुरूम टाकून असल्याने त्याच ठिकाणी उपस्थित विजय मत्ते यांच्याशी रस्त्यावर माती का टाकली व कधी हटवणार अशी त्यांनी विचारणा केली. दरम्यान मृतक अनिल मते व विजय मते या दोघांमध्ये वाद निर्माण झाला. वाद विकोपाला जाऊन त्याचे हाणामारीत रूपांतर झाले. त्यानंतर विजय मत्ते तेथून निघून गेला. मात्र अनिल मत्ते तिथेच आपली दुचाकी वाहन क्र. MH-३४ AD २४७४ बाजूला ठेवून त्या मातीच्या ढिगार्‍याजवळ राहून गेला.

 दरम्यान काही वेळानंतर विजय मत्ते यांनी माजरी येथील रेल्वे साइडिंगवरून एका कंत्राटदाराचे पी लोडर मशीन बोलावून सदर रस्त्यावर असलेली माती ढकलत असताना त्याच ठिकाणी राहून गेलेला अनिल मत्ते यांचे वर मशिनने माती टाकण्यात आली. दरम्यान त्याची दुचाकी वाहन तिथेच उभे असल्याने त्याच्या एका नातेवाईकाने आपल्या घरी घेऊन गेला. दुचाकी वाहन आले पण अनिल आला नाही त्यामुळे घरच्यांनी त्याचा शोध घेणे सुरू केले. दरम्यान कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी मिळून अनिलचा शोध घेत ते चालबर्डी फाट्यावर पोहोचले व तिथे शोध घेतले असता, त्यांच्या मनात आले की आपला मुलगा याच मातीत दबला असावा असा संशय त्यांना आला. दरम्यान याबाबतची माहिती माजरी पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच माजरी पोलिसांची पथक घटनास्थळी दाखल होऊन शोध मोहीम राबवली.घटनास्थळी काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. घटनेचा गांभीर्य बघून भद्रावती, वरोरा या ठाण्यातील ठाणेदारांना सुद्धा बोलावण्यात आले.  गावाकऱ्यांनी एमटा खाणीची कोळसा वाहतूक पण काही काळासाठी थांबविली होती.
उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी माजरीचे ठाणेदार अजित सिंग देवरे यांनी स्वतः मातीला बाजू करून दबलेल्या अनिल मत्ते यांचा शव शोधून काढला.


दरम्यान सदर घटना आरोपींनी जाणीवपूर्वक घडवून आणल्याचा आरोप मृतक अनिल मत्ते यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
याप्रकरणी विजय रामदास मत्ते व मंगेश उपरे डोजर चालक यांच्याविरुद्ध माजरी पोलिस ठाण्यात भादवि कलम ३०४/३४ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली. सोमवारी आरोपींना भद्रावतीच्या न्यायालयात हजर केले असता, आरोपींना तीन दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. माजरी पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पाठविण्यात आले. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात माजरीचे ठाणेदार अजित सिंग देवरे हे करीत आहे.

Comments