Warora
* एक टोलबुथ बंद करण्याची युवा सेनेची मागणी
वरोरा : दोन टोलबुथ मधील अंतर किमान ४० किलोमीटर असावे असा नियम असताना त्याला वेशीवर टांगून वरोरा ते वणी या महामार्गावर सात किलोमीटर अंतरावर चक्क दोन टोलबुथ आहे. या टोलबूथच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक लूट सुरू असल्याने यापैकी एक बंद करावा तसेच शेंबळ परिसरातील दहा किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या नागरिकांच्या सर्व प्रकारच्या वाहनांना टोल मधून सूट देण्यात यावी अशी मागणी युवासेनेचे चंद्रपूर जिल्हाप्रमुख मनीष जेठाणी यांनी रोहन राजदीप आरओबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या टोल प्लाझा प्रमुखाकडे निवेदनातून केली आहे.
वरोरा ते वणी या राज्य महामार्गाचे काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग मध्ये रूपांतर झाले. दरम्यान वरोरा ते वणी हा मार्ग शेंबळ वरून नंदोरीच्या दिशेने वळविण्यात येवून तो नागपूर-चंद्रपूर या राष्ट्रीय महामार्गाला जोडण्यात आला. आणि या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे व मार्गावरील सर्व पुलांची कामे अलीकडेच पूर्ण झाली. दरम्यान बीओटी तत्त्वावर हे काम पूर्ण केले गेले असल्याने सदर मार्गावर शेंबळ नजीक टोलबूथ उभारण्यात आलेला आहे. या टोलबूथ वरून सर्व चारचाकी वाहनांकडून टोल वसूल केल्या जात आहे.तर वरोरा येथील रेल्वे क्रॉसिंग वर काही वर्षांपूर्वी बीओटी तत्त्वावर उड्डाणपूल बांधण्यात आला. त्याकरिता वरोरा येथे टोलबूथ उभारण्यात आले असून त्यावरून पूर्वीपासुन टोल वसुली सुरू आहे.
परंतु या टोलबुथ पासून शेंबळ येथे उभारण्यात आलेल्या नवीन टोलबूथ चे अंतर केवळ सात किलोमीटर आहे. आणि दोन टोलबूथ मधील अंतर हे ४० किलोमीटर असावे असा नियम आहे. असे असतानाही दोन्ही टोलबूथ वरून सरसकट वाहन चालकांकडून वसुली केली जात आहे.२० ते २५ किमी परिसरातील गावकऱ्यांसाठी वरोरा मोठी बाजारपेठ असून कुचना येथे असलेले वेकोली कार्यालय, आणि परिसरातील कोळसा खाणी तसेच एकोना व बेलगांव कोळसा खान, भाजी मार्केट व कृषी उत्पन्न बाजार समिती ,जीएमआरमार व साई वर्धापॉवर कंपन्या आणि उत्तम शिक्षणासाठी वरोरा येथील शैक्षणिक संस्थांची असलेली ओळख तसेच येथे मिळणाऱ्या आरोग्य सुविधा यामुळे नागरिकांचा सारखा कल वरोराकडे येण्याचा असतो. परिणामी वणी मार्गावरून वरोरा कडे स्वतःच्या चार चाकी वाहनाने येणाऱ्या व परत जाणाऱ्या सर्व नागरिकांना आर्थिक भूरदंड सहन करावा लागत आहे. यामुळे सदर मार्गावरील एक टोलबुथ बंद करण्यात यावा, तसेच शेंबळ परिसरातील दहा किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या नागरिकांच्या सर्व प्रकारच्या वाहनांना टोल मधून सरसकट सूट देण्यात यावी अशी मागणी युवा सेनेचे चंद्रपूर जिल्हाप्रमुख मनीष जेठाणी यांनी रोहन राजदीप आरओबी इन्फ्रास्ट्रक्चरच्या टोल प्लाझा प्रमुखांकडे निवेदनातून केली आहे.यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख मनीष जेठाणी यांच्या नेतृत्वात
शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमित निब्रड,युवासेना जिल्हा समनव्यक दिनेश यादव,शिवसेना शहर प्रमुख संदीप मेश्राम,कंत्राटी कामगार सेना तालुका प्रमुख हनुमान ठेंगणे उपस्थित होते.
त्यांनी याबाबतची तक्रार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कडे देखील पाठविलेली आहे.
Comments
Post a Comment