शासकीय तांदूळ तस्करी प्रकरणातील आरोपीला २३ पर्यंत पोलीस कोठडी *प्रकरणाचा तपास चिमूर पोलीस निरीक्षकांकडे * फरार आरोपींचा शोध सुरू

शासकीय तांदूळ तस्करी प्रकरणातील आरोपीला २३ पर्यंत पोलीस कोठडी 
 *प्रकरणाचा तपास चिमूर पोलीस निरीक्षकांकडे 
* फरार आरोपींचा शोध सुरू
वरोरा (चंद्रपूर): तालुक्यातील शेगाव (बु) पोलिसांनी तांदूळ तस्करी प्रकरणात केलेल्या कारवाईत माढेळी येथील आरोपी असलेला मुख्य सूत्रधार व व्यापारी राहुल वामनराव देवतळे अजूनही फरार आहे. तर अटकेतील आरोपी ट्रकचालक माणिकराव रामाजी कोचे याला आज शनिवार दि १९ ऑगस्ट रोजी वरोरा येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला  २३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास चिमूर येथील पोलीस निरीक्षक मनोज गभने यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

वरोरा ( चंद्रपुर) : शासकीय स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ काळ्या बाजारात विक्री करिता नेला जात असताना शेगाव (बु) पोलिसांनी सापळा रचून पकडला. याप्रकरणी अन्न व  पुरवठा विभाग अधिकारी यांच्या मदतीने पोलिसांनी ६ लाख वीस हजार रुपयांचा ३१ टन तांदूळ आणि २५ लाख रुपयांचा ट्रक असा ३१ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त करून तालुक्यातील माढेळी येथील मुख्य सूत्रधार व व्यापारी राहुल वामनराव देवतळे, ट्रक मालक रामजीत साहू (छत्तीसगड) आणि ट्रक चालक माणिकराव रामाजी कोचे या तीन आरोपींविरुद्ध १८ऑगस्ट रोजी अपराध क्रमांक २६३ नुसार अत्यावश्यक जीवनावश्यक वस्तू अधिनियम ३ व ७ या इसी ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 
शासकीय तांदूळ तस्करीची माहिती सर्वप्रथम वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांना मिळाली होती. माहिती मिळताच त्यांनी वरोरा पोलीस ठाण्यातील पथकाच्या मदतीने सापळा लावला. परंतु तोपर्यंत त्या ट्रकने वरोरा पोलीस स्टेशनची हद्द ओलांडून शेगाव (बु) पोलीस स्टेशन हद्दीत प्रवेश केला होता. यामुळे सदर माहिती उपविभागीय अधिकारी आयुष नोपाणी यांनी शेगाव पोलिसांना दिली आणि शेगाव चे ठाणेदार अविनाश मेश्राम यांनी ट्रक पकडून कारवाईला मूर्त रूप दिले. दरम्यान या  प्रकरणात अटकेत असलेला ट्रक चालक माणिकराव कोचे याला आज शनिवारी वरोरा येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची २३ ऑगस्ट पर्यंत  पोलीस कोठडीत रवानगी केली. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले व्यापारी राहुल वामनराव देवतळे याचा शेगाव पोलिसांनी आज शनिवार रोजी माढळी मध्ये शोध घेतला. त्याच्या दुकान आणि गोदाम यांची पाहणी पोलिसांनी केली. परंतु तो आरोपी  पोलिसांना सापडला नाही. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केल्याचे सांगितले जाते. दरम्यान या प्रकरणाचा तपास शेगाव (बु) पोलिसांकडून काढून तो चिमूर येथील पोलीस निरीक्षक मनोज गभणे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

माढेळी मधील सील गोदामात तांदळाचा आणखी साठा 

शेगाव पोलिसांनी पकडलेला अवैधरित्या काळ्या बाजारात जात असलेला शासकीय तांदूळ हा माढेळी येथील राहुल देवतळे यांचा असल्याचे स्पष्ट होताच वरोरा पोलीस आणि अन्नपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी माढेळी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्ड मध्ये राहुल देवतळे यांच्या गोदामावर धाड टाकून ते सील केले. या गोदामा मध्ये शासकीय तांदळाचा मोठा साठा पोलीस आणि पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना आढळून आल्याचे सांगितले जाते. बाजार समितीच्या अधिकाऱ्यांचे आतापर्यंत याकडे लक्ष का गेले नाही असा प्रश्न यानिमित्ताने पुढे आला आहे.

बाजार समितीमध्ये भरला जातो तांदळाचा शेस

  कारवाई झालेल्या तांदळाचेच नव्हे तर इतर जातीच्या तांदळाचे फारसे उत्पादन माढेळी परिसरात नाही. असे असताना राहुल देवतळे याला शेतमाल खरेदी करण्यासाठी दिलेल्या परवानगीवरुन त्याचे कडून तांदळाचा शेस कृषी उत्पन्न बाजार समिती घेत असल्याचे समजते.त्या परिसरात शेतमाल खरेदी करणारे इतर मोठे व्यापारी आहे. त्यांच्याकडे देखील तांदळाची खरेदी नाही. तेव्हा राहुल देवतळे याच्याकडेच तांदूळ खरेदी आणि त्याचा शेस कसा असा प्रश्न आहे. याबाबतचा बाजार समितीचे सचिव चंद्रसेन शिंदे यांना विचारले असता त्यांचे कडून माहिती मिळू शकली नाही.

जाहिरात 

Comments