*एका आंदोलन कर्त्याची प्रकृती बिघडली तर एक गंभीर जखमी*
वरोरा : शाम ठेंगडी वरोरा
वरोडा आणि चिमूर तालुक्याच्या सीमेवर असलेले माकोणा हे गाव चिमूर तालुक्यात येते. मात्र माकोणा येथील शेतकऱ्यांच्या शेती वरोडा तालुक्यातील येतात. सीमेवर असलेला नाला ओलांडून शेतकऱ्यांना आपल्या शेतात जावे लागते. मात्र शेतात जाताना पाजरेपार रीठ नाला ओलांडून जावे लागते.दोन्ही तालुक्यातील अधिकारी पाजरेपार रीठ ते गिरोला व पाजरेपार ते आबमत्ता हे रस्ते आपल्या क्षेत्रात येत नसल्याचा सांगावा करत असल्याने माकोण्यातील शेतकरी मरण यातना भोगतांना दिसत आहेत.
पाजरेपार रीठ येथे रस्त्यासाठी आंदोलन करत असणारे शेतकरी आता आक्रमक झाले आहेत.समस्याग्रस्त शेतकरी हे येथील शिवबंधाऱ्याजवळ 19 डिसेंबरपासून धरणे रात्रंदिवस धरणे आंदोलन करीत आहे. या आंदोलनातील आंदोलकांपैकी काल रात्री एका आंदोलकाची प्रकृती बिघडली. तर आज २२ डिसेंबरला सकाळी एका शेतकऱ्याची बैलबंडी नाल्यात उलटल्याने एक शेतकरी गंभीर जखमी झाला.गंभीर जखमी शेतकऱ्याला प्रथम सावरी येथील प्राथमिक उपचार केंद्रात भरती करण्यात आले. तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यास वरोडा येथील जिल्हा उप रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
पाजरेपार रीठ ते गिरोला व पाजरेपार रीठ ते आबमत्ता या रस्त्याच्या बांधकामासाठी शेतकरी गेल्या पंचवीस वर्षापासून संघर्ष करत आहेत. परंतु प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.
या रस्त्याच्या मागणीसाठी भीम आर्मी संविधान रक्षक दल ने पुढाकार घेऊन " बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर " असे अनोखे आंदोलन 19 डिसेंबर पासून पाजरेपार रीठ येथील शिवबंधाऱ्याजवळ सुरू केले आहे. हे आंदोलन दिवसा व कडाक्याच्या थंडीत रात्रीही करण्यात येत आहे. काल 21 डिसेंबर रोजी रात्री ९.३झ० च्या सुमारास आंदोलनकर्ते चंद्रकांत बापूराव पिंपळकर यांची प्रकृती अचानक बिघडली. याची माहिती इतर आंदोलनकर्त्यांनी डॉक्टर चौधरी यांना दिली.त्यामुळे सावरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर चौधरी हे घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी चंद्रकांत पिंपळकर यांच्यावर उपचार केले.ही माहिती शेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अविनाश मेश्राम यांनाही देण्यात आली आहे.
तसेच आज शुक्रवार २२ डिसेंबरला सकाळी उमाकांत रामराव सूर्यवंशी हे शेतात असलेला कापूस आणण्यासाठी बैलबंडी घेऊन गेले होते. बैलबंडीत कापसाचे गाठोडे भरून आणत असताना त्यांची बैल बंडी नाल्यात उलटली व बैलबंडीचे चाक त्यांच्या पायावरून गेल्याने त्यांच्या पायाला इजा झाली आहे. बेलवंडी नाल्यात पडल्याने त्यांच्या छातीला तसेच इतर ठिकाणीही मार लागला आहे. त्यामुळे त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत आहे. त्यामुळे सहकारी शेतकऱ्यांनी त्यांना वरोडा येथे आणून एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
गेल्या पंचवीस वर्षापासून पुढाकार घेऊन हा रस्ता न केल्याने या घटनेला जिल्हाधिकारी जबाबदार असल्याचे गृहीत धरून भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे जगदीश मेश्राम हे जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार नोंदविण्यास शेगाव पोलीस स्टेशनला गेले असता तेथील अधिकाऱ्यांनी आपली तक्रार घेतली नसल्याची माहिती त्यांनी दिली.
Comments
Post a Comment