महाप्रसादातून अन्न विषबाधा : एकाचा मृत्यू**माजरी येथील घटना : 232 रुग्ण उपचारार्थ दाखल*

*महाप्रसादातून अन्न विषबाधा : एकाचा मृत्यू*

*माजरी येथील घटना : 232 रुग्ण उपचारार्थ दाखल*

             भद्रावती तालुक्यातील माजरी येथील काली माता मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादातून शेकडो नागरिकांना अन्नविषबाधा  झाल्याची माहिती दिनांक 14 रोज रविवारला पहाटे तीन वाजता उघडकीस आली आहे. यात गुरुफेक राम यादव राहणार माजरी वय 80 वर्ष या वृद्धाचा मृत्यू झाला असून विषबाधा झालेल्या 232 रुग्णांना माजरी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय वरोरा व भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 
वरोरा उपजिल्हा रुग्णालय येथे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी भेट देऊन रुग्णांची परिस्थिती जाणून घेतली.
सर्व दाखल रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. याबाबत कार्यक्रमाचे आयोजक बबलू राम यादव यांना चौकशीसाठी माजरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. माजरी येथील न्यू हाउसिंग एरिया,  काली माता मंदिरात दिनांक 13 रोज शनिवारला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हा महाप्रसाद रात्रो 10 वाजेपर्यंत चालला. त्यानंतर रात्रो 1 वाजता च्या दरम्यान महाप्रसादाचा लाभ घेणाऱ्या शेकडो नागरिकांना उलट्या, संडास व पोटदुखी सुरू झाल्याने त्यांना माजरी येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. आज पहाटे चार वाजेपर्यंत 232 रुग्णांना माजरी, वरोरा व भद्रावती येथील आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या सर्वांना महाप्रसादातील भोजनातून अन्न विषबाधा झाली असल्याचा आरोग्य विभागाचा प्राथमिक अंदाज आहे.

 दिनांक 14 रोज रविवारला सकाळी सहा वाजता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अशोक कराटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर महादेव चिंचोले, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय आसुटकर, वरोरा येथील डॉक्टर खुजे आदींनी रुग्णांना भेट दिली असून याप्रकरणी अन्न व पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या  आहे.


Comments