*सकाळी साडेसात वाजेपासून चार अधिकारी तळ ठोकून
वरोरा (चंद्रपूर) : वरोरा तालुक्यातील मजरा परिसरात असलेल्या बी.एस.इस्पात कंपनीवर इडीच्या पथकाने आज गुरुवार दि.२० जून रोजी सकाळी साडे सात वाजताच्या सुमारास अचानक धाड टाकली. दरम्यान वृत्त लिहितपर्यंत इडीचे ४ अधिकारी सीआयएसएफच्या जवानांसह कंपनीतच तळ ठोकून होते. कोळशाची हेराफेरी आणि आर्थिक गैरव्यवहार यातून ही धाड टाकण्यात आली असल्याची चर्चा आहे.
वरोरा तालुक्यातील मजरा परिसरात असलेल्या बी.एस.इस्पात कंपनीला मारकी-३ मुकुटबन तालुका वणी जिल्हा यवतमाळ येथील कोळसा खाणीतून कोळसा येत होता. हा कोळसा वणी तालुक्यातील भालर रोडवरील एमआयडीसी परिसरात असलेल्या इंडोयुनिक फ्लेम लिमिटेड या कोल वॉशरी कडून स्वच्छ करून तो कंपनी पर्यंत पोहोचत होता. बी.एस.इस्पात आणि कोल वॉशरी मध्ये झालेल्या करारानुसार ६ मार्च २०२२ ते १९ जून २०२२ दरम्यान ४१२७१.१४ मॅट्रिक टन कोळसा कोल वॉशरी कडे स्वच्छ करण्यासाठी पाठविण्यात आला होता. परंतू त्यापैकी २५०३१.७७ मॅट्रिक टन कोळसा कोल वॉशरीने बी.एस. इस्पातला परत केला नाही.
बी.एस.इस्पात कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार येताच त्यांनी याबाबत कोल वॉशरी कंपनी संचालका सोबत पत्र देऊन आणि वैयक्तिक देखील संपर्क केला. परंतु त्यांना योग्य उत्तर मिळाले नाही. यानंतर बी.एस.इस्पात कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कोल वॉशरी कंपनी मध्ये जाऊन मोका तपासणी केली असता वॉशरीमधून कोळसा गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामुळे कोळसा वॉशरीने कोळशाची परस्पर विल्हेवाट लावून बी.एस.इस्पात कंपनीची फसवणूक केली असल्याने २८ डिसेंबर २०२३ रोजी यासंदर्भात वरोरा पोलीस ठाण्यात पहिली तक्रार दिली होती .परंतु पोलिसांनी त्या तक्रारीची दखल घेतली नाही. यानंतर बी.एस.इस्पात कंपनीचे उपाध्यक्ष सागर कासनगोट्टावार यांनी दिनांक ६ मे २०२४ रोजी पुन्हा या संदर्भात पोलिसात तक्रार दिली . यावेळी मात्र तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी कोल वॉशरी संचालक विपुल चौधरी यांचे विरुद्ध १० कोटी १ लाख २८ हजार रुपयांच्या कोळशाची अफरातफर केल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.
सदर प्रकरण समोर असतानाच बीएसइस्पात कंपनीकडून नागपूर येथील एका व्यक्तीची फसवणूक झाल्याची चर्चा होती. सदर प्रकरणी त्या व्यक्तीने पोलीस तक्रार दिल्याचे म्हटले जात होते.
तसेच अशाच एका प्रकरणात एक आठवड्यापूर्वी अग्रवाल नामक व्यक्तीला अटक झाली असल्याचे सांगितले जाते . यामुळे एकूणच या कोळसा हेराफेरी प्रकरणातून झालेला आर्थिक व्यवहार आणि फसवणूक याच कारणाने इडीच्या पथकाने आज ही धाड टाकली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान आर्थिक व्यवहारासंदर्भातील सर्व दस्तावेज इडी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू केली आहे. यादरम्यान कुणालाही आत मध्ये येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. वृत्तलीतपर्यंत इडीचे ४ अधिकारी कंपनीच्या कार्यालयातच ठाण मांडून चौकशी करीत होते. तर सीआयएसएफ चे जवान कार्यालया बाहेर पहारा देत होते. परंतु धाड व चौकशी संदर्भात अधिकृत माहिती मिळू शकली नाही.
ह्या कंपनीचा मालक कोण आहे.
ReplyDelete