*पीक कर्ज वाटपाच्या प्रक्रियेची गती वाढवा* *-पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश* *ना. मुनगंटीवार यांनी घेतला कृषी व संलग्नित विभागांचा आढावा*

*पीक कर्ज वाटपाच्या प्रक्रियेची गती वाढवा* 

*-पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश* 

*ना. मुनगंटीवार यांनी घेतला कृषी व संलग्नित विभागांचा आढावा*

*चंद्रपूर, दि. 22 : शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या खरीप हंगामाला सुरवात झाली आहे. या हंगामावरच शेतकऱ्यांचा संपूर्ण आर्थिक डोलारा उभा राहतो. पेरणीच्या वेळेस बियाणे, खते घेण्यासाठी शेतकऱ्यांना आज पीक कर्जाची अत्यंत गरज आहे. त्यामुळे पीक कर्ज वाटपाच्या प्रक्रियेची गती वाढवून शेतकऱ्यांना वेळेवर पैसे उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देश राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (शनिवार) दिले.*
नियोजन सभागृह येथे कृषी व कृषी संलग्न विभागासोबत खरीप हंगामाचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, आत्माच्या प्रकल्प संचालीका प्रिती हिरुळकर, कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, रामपालसिंग व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पीक कर्ज वाटपात विशेष लक्ष देणे गरजेचे आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, शेतक-यांना वेळेवर कर्ज उपलब्ध होण्यासाठी बँकांनी विशेष शिबिर घेऊन कर्जवाटप करावे. कर्जवाटपासाठी बँकेत अतिरिक्त मनुष्यबळ नियुक्त करावे. राष्ट्रीयकृत बँकांची कर्जवाटपाची गती अतिशय कमी आहे. यात सुधारणा करावी. 20 ते 22 ग्रामपंचायती संलग्न असलेल्या एखाद्या बँकेत केवळ 80 शेतक-यांना कर्ज वाटप होत असेल तर ही अतिशय गंभीर बाब आहे. व्यवस्थापक किंवा एखाद्या संबंधित व्यक्ती उपलब्ध नसला तर सदर कार्यभार दुस-या कर्मचा-यांकडे सोपवून पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया सोयीची करावी, असे निर्देश पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी बँकांना दिले. 

गतवर्षीपासून शासनाने 1 रुपयात प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली आहे. यापूर्वी केवळ 50 ते 60 हजार शेतकरी या योजनेत सहभागी होत होते. मात्र गतवर्षी जिल्ह्यातील जवळपास 3 लाख शेतकरी या योजनेत सहभागी झाले. ही चांगली बाब असल्याचेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले. यावेळी पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी खरीप हंगाम 2024-25 चे नियोजन, बियाणे व खतांची उपलब्धता, गुणनियंत्रणाबाबत कार्यवाही, अनधिकृत कापूस बियाणे विक्रीविरुध्द कार्यवाही, प्रधानमंत्री पीक विमा योजना, 2023-24 मध्ये नैसर्गिक आपत्ती अंतर्गत खरीप व रब्बी मध्ये पिकांचे झालेल नुकसान, नुकसानभरपाईचे अनुदान वाटप, पीक कर्ज वाटप, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, प्रलंबित कृषी पंप जोडणी यासोबतच आत्मा अंतर्गत राबविण्यात येणारे विविध उपक्रमाचा आढावा घेतला.   

सादरीकरणात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. तोटावार यांनी सांगितले की, सद्यस्थितीत जिल्ह्यात खरीपाचे हंगामाकरिता 777 कोटी रुपये पीककर्ज वाटप करण्यात आले असून त्याची टक्केवारी 62.14 टक्के इतकी आहे.आतापर्यंत सर्वाधिक चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 94 टक्के पीक कर्ज वाटप केले आहे . उर्वरित जून अखेरीज वाटप करण्या बाबत सर्व बँकाना निर्देश पालकमंत्री महोदयांनी यांनी दिले आहे.

पीक विमा योजने अंतर्गत 91 कोटी 62 लाख मंजूर झाला असून आतापर्यंत 25 कोटी 45 लाख पीक विमा शेताकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे.आजच 17 कोटी रुपये  पीक विमा पोर्टलवर अपलोड करण्यात आलेला आहे. उर्वरित रक्कम जून अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याबाबत ओरियंटल विमा कंपनीला निर्देश दिले आहे .

जिल्ह्यात एकूण लागवडीलायक क्षेत्र 5 लक्ष 52 हजार 729 हेक्टर असून सर्वसाधारण खरीपाचे क्षेत्र 4 लक्ष 58 हजार 857 हेक्टर (83.01 टक्के)  आहे. जिल्ह्यात खरीप हंगाम 2024-25 मध्ये 1 लक्ष 91 हजार हेक्टरवर भाताची लागवड, 1 लक्ष 80 हजार हेक्टरवर कापूस तर 75 हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात या वर्षी आतापर्यंत 41 हजार 918 हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात 20 जून 2024 पर्यंत 76 हजार 263 मे.टन बियाणे उपलब्ध झाले असून यापैकी 49 हजार 663 मे.टन बियाणांची विक्री झाली आहे. तर 88 हजार मे. टन खते जिल्ह्यात उपलब्ध आहे. बियाणे आणि खतांची कोणतीही कमतरता नसून पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे श्री. तोटावार यांनी सांगितले.


*‘शेतकऱ्यांना कागदपत्रांसाठी अतिरिक्त भुर्दंड पडणार नाही याची काळजी घ्या’*
गेल्यावर्षाप्रमाणे यंदाही प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकरी सहभागी होतील, यासाठी कृषी विभागाने नियोजन करावे. केवळ 1 रुपयात या योजनेत सहभागी होता येत असले तरी काही ठिकाणी कागदपत्रांसाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागतात, अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे कृषी व महसूल विभागाने याकडे गांभिर्याने लक्ष देऊन शेतक-यांना अतिरिक्त भुर्दंड पडणार नाही, याची काळजी घ्यावी, अशाही सूचना ना. श्री. मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

Comments