*रेल्वे प्रशासनाच्या चुकीने त्या आठ गावाचा भद्रावतीशी संपर्क तुटला**आठ गावातील नागरीकांचा वासुदेव ठाकरे यांच्या नेतृत्वात रेल्वे प्रशासनाला आंदोलनाचा इशारा**गावकऱ्यांच्या आंदोलनानंतर रेल्वे प्रशासन लागले कामाला*

*रेल्वे प्रशासनाच्या चुकीने त्या आठ गावाचा भद्रावतीशी संपर्क तुटला*

*आठ गावातील नागरीकांचा वासुदेव ठाकरे यांच्या नेतृत्वात रेल्वे प्रशासनाला आंदोलनाचा इशारा*

*गावकऱ्यांच्या आंदोलनानंतर रेल्वे प्रशासन लागले कामाला*

अतुल कोल्हे भद्रावती : 

तालुक्यातील चिरादेवी, चारगाव, ढोरवासा, तेलवासा, पिपरी, कोच्ची, घोणाड, मुरसा या आठ गावाचा रेल्वे प्रशासनाच्या चुकीच्या कार्यपध्दतीमुळे भद्रावती शहराशी संपर्क तुटला आहे. याविरोधात आज (दि.२०) ला चिरादेवी गावचे माजी सरपंच व भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती वासुदेव ठाकरे यांच्या नेतृत्वात आठ गावातील नागरीकांनी रेल्वे प्रशासनाविरोधात आंदोलनाची भूमिका घेताच रेल्वे प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करीत रस्ता पूर्ववत करण्याचे काम हाती घेतले. 

मागील आठवडा भरापासून तालुक्यात संततधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे परिसर जलमय झाला आहे. तालुक्यातील नदी, नाले भरुन वाहू लागले आहे. अशातच रेल्वे प्रशासनातर्फे भद्रावती शहर व त्या आठ गावाच्या दरम्यान जात असलेल्या रेल्वेच्या तिसऱ्या लाईनचे काम सुरु केले आहे. ही रेल्वेची तिसरी लाईन बनविण्याकरिता रेल्वे प्रशासनाने बाजूलाच असलेल्या नाल्यावरील पुलाची भिंत तोडली. त्यामुळे त्या नाल्यातील पाणी रेल्वेच्या बोगदा क्रमांक ३६ मधे घुसले. तिथे पाण्याची पातळी ४ ते ५ फूट पर्यंत वाढली परिणामी त्या आठ गावातील नागरीकांचा बोगदा क्रमांक ३६ मधून भद्रावती शहरात जाण्याचा मार्ग बंद झाला. याचा त्रास गावातील विद्यार्थी, रुग्ण, दुग्धव्यावसायिक, व नागरिकांना होवू लागला.

या विरोधात स्थानिक गावकऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेवून सदर काम करणारे अभियंता राजूरकर, वरिष्ठ अभियंता शर्मा व आटे यांना त्यांच्या कार्यालयात येवून शाळा भरवण्याची तंबी दिली. तेव्हा तात्काळ अभियंता राजूरकर यांनी वरिष्ठ अभियंता शर्मा व आटे यांच्याशी चर्चा करून रेल्वेच्या तिसऱ्या लाईनसाठी तोडलेली नाल्याच्या शेजारची जी भिंत होती ती पुढील चार दिवसात बांधून उभी करण्याचे आश्वासन दिले. सोबतच तात्काळ जेसीबी व पोकलेन मशीन आणून नाला व रस्त्याच्या दरम्यान मातीची पार टाकण्याचे व रस्त्यावरील गाळ काढण्याचे काम सुरु केले. आज (दि.२०) ला सायंकाळ पर्यंत सदर काम करून दिल्याने सध्या तात्पुरत्या स्वरूपात गावकऱ्यांसाठी शहरात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

पुढील चार दिवसात भिंत न उभारल्यास रेल्वे प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

यावेळी चिरादेवी गावचे माजी सरपंच तथा भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती वासुदेव ठाकरे, तेलवासा गावचे सरपंच आकाश जुनघरे, चिरादेवी ग्रा. पं. चे सदस्य विलास आत्राम, अभिजित डोंगे, सतीश नांदे, प्रल्हाद वरखडे आदी उपस्थित होते.

Comments