दत्ताजी मनस्वी योगीच : डॉ. चंद्रशेखर भुसारी**जन्मशताब्दी वर्षानिमित्त अभाविपचे जिल्हा संमेलन*

*दत्ताजी मनस्वी योगीच : डॉ. चंद्रशेखर भुसारी*

*जन्मशताब्दी वर्षानिमित्त अभाविपचे जिल्हा संमेलन*

चंद्रपूर :

• १९४७ मध्ये मद्रास प्रांतात प्रचारक म्हणून जाणे, भाषेची, संस्कृतीची भिन्नता असताना तेथे पाय रोवणे, संपर्क करण्यासाठी तेथील भाषा शिकणे, तेही इतक्या बेमालूम आणि उत्तमरीत्या की तेथील नागरिकांना आपल्याच भाषेचा माणूस वाटावा आणि त्यांनी म्हणावे, दत्ताजी तेलगू भाषक आहेच, पण त्यांना मराठीही चांगली येते, हे खचितच सोपे काम नाही. त्यासाठी दत्ताजींसारखा मनस्वी योगी लागतो, असे गौरवोद्गार गोंडवाना विद्यापीठाचे सेवानिवृत्त प्र-कुलगुरू डॉ. चंद्रशेखर भुसारी यांनी येथे काढले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संस्थापक, कन्याकुमारीच्या स्वामी विवेकानंद शिला स्मारकाच्या उभारणीत अग्रेसर असलेले श्रद्धेय दत्ताजी डिडोळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या अनुषंगाने मंगळवार, ९ जुलै रोजी सायंकाळी अभाविपच्या जुन्या तसेच विद्यमान कार्यकर्त्यांचे जिल्हा संमेलन येथील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडले. 
         राष्ट्रीय विद्यार्थी दिनाचे औचित्य साधून आयोजित या संमेलनात प्रमुख वक्ता म्हणून डॉ.भुसारी यांनी अनुभव कथन केले.  
      रा. स्व. संघाचे नगर संघचालक अॅड्. रवींद्रजी भागवत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर
दत्ताजी डिडोळकर जन्मशताब्दी जिल्हा समितीचे अध्यक्ष बाबा भागडे, अभाविप विदर्भ प्रांताचे संघटन मंत्री विक्रमजित कलाने, जिल्हा संयोजक आदित्य गचकेश्वर यांची उपस्थिती होती.

डॉ. भुसारी यांनी, दत्ताजींचा जीवनप्रवास विशद केला.
*विश्वात सर्वात मोठी संघटना: भागवत* 
       दत्ताजींनी  अभाविपच्या स्थापनेपासून त्यांनी या विद्यार्थी संघटनेची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. आज देशातच नव्हे, तर अवघ्या विश्वात सर्वांत मोठी विद्यार्थी संघटना म्हणून अभाविपचा लौकिक आहे. विवेकानंद शिला स्मारकासाठी त्यांचे योगदान मोठेच आहे, तर मिसाबंदीच्या काळात अभाविपचे काम करण्याचा योग आला. बंदी उठत्यानंतरही मी कार्यकारिणीत कायम असल्याने मला संमेलनाचे बोलावणे आले तेव्हा दत्ताजींची भेट झाली. अतिशय साधे, सरळ, पण एका महान व्यक्तीशी आपण बोलत आहोत असे वाटले. आणिबाणीच्या काळात अभाविपच्या कार्यकर्त्यांनीच आंदोलनाची धुरा सांभाळली होती. गेल्या ७५ वर्षांत या संघटनेने माणसे घडविण्याचे कार्य केले असे प्रतिपादन अॅड. भागवत यांनी केले.
*आजचा विद्यार्थी मोबाईल मध्ये अडकला: कलाने*
विक्रमजित कलाने यांनी अभाविपच्या प्रवासावर प्रकाश टाकला. तुलनेने आता विद्यार्थ्यांच संघटन आव्हानात्मक असल्याचे ते म्हणाले. कारण विद्यार्थी मोबाईलमध्ये अडकला आहे. त्यातून त्याला बाहेर काढून समाजसेवेच्या कार्यात आणणे सोपे नाही. शिवाय आता शैक्षणिक परिसरातील विद्यार्थ्यांची उपस्थितीही ढासळत चालली आहे. अशा स्थितीतही कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना आणण्याचे काम परिषद करणार असत्याचेही ते म्हणाले.

संचालन अभाविपचे शहर अध्यक्ष डॉ. पंकज काकडे यांनी केले. यावेळी रा. स्व. संघाचे विभाग प्रचारक दीनदयालजी चावरे, जिल्हा प्रचारक गुरचंदजी बावणे, राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा गोंडवाना विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. अनिल चिताडे, गुरुदास कामडी, प्रशांत दोंतुलवार, भाजपाचे डॉ. मंगेश गुलवाडे, राम लाखिया आदी मान्यवर उपस्थित होते. 
*ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार*
यावेळी अभाविपचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्याम ठेंगडी, यशोधन खममकर, जया भारत, गिरीश एलकुंचवार, रंजन भागवत तथा बाबा भागडे यांचा सत्कार अॅड. रवींद्र भागवत यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला.

Comments