बससेवा सुरू करा, अन्यथा कोळश्याची वाहतूक थांबवणार**एकोणावासियांची मागणी व इशारा*


*बससेवा सुरू करा, अन्यथा कोळश्याची वाहतूक थांबवणार*

*एकोणावासियांची मागणी व इशारा*
 वरोडा : शाम ठेंगडी 

     तालुक्यातील एकोणा येथे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा पूर्ववत सुरू करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.  रस्ता अरुंद असल्याने बस वाहतुकीस अडचणीचे होत असून अपघात होण्याची शक्यता असल्याने बस सेवा बंद करण्यात आलीआहे. त्यामुळे विद्यार्थी व वृद्धांना शहरात येण्यासाठी बराच त्रास होत आहे.
    एकोणा गावालगत वेकोलीची खुली कोळसा खाण आहे.वेकोलीने या गावाला जाणारा  पूर्वपार रस्ता बंद करून गावकऱ्यांच्या रहदारीसाठी नवीन रस्ता बांधून दिला. या रस्त्याने बससेवा सुरू करण्यात आली होती.परंतु हा रस्ता अतिशय अरुंद असून पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे समोर येणाऱ्या वाहनास रस्ता देण्यासाठी बसला जागा नसल्याने  बस फसण्याची शक्यता आहे.यामुळे बससेवा बंद करण्यात येत असून रस्त्याची सुधारणा करण्यात यावी असे पत्र राज्य परिवहन महामंडळाच्या वरोडा आगार प्रमुखांनी एकोणाचे सरपंच यांना दिले आहे.
        या बांधलेल्या नवीन रस्त्याच्या बाजूला नालाही आहे.या रस्त्याने कोळश्याची वाहतूक करणारे ट्रकही येणे जाणे करतात. त्यामुळे कोशाची वाहतूक करणाऱ्या जड  वाहनांना जागा करून देताना बस नाल्यात पडण्याचा धोकाही आहे. तरी सदर रस्त्याचे काम पूर्ण करून बस आगराला कळविल्यास बस सेवा पूर्ववत सुरू करता येईल अशा आशयाचे पत्र एकोणाचे सरपंच यांना बस आगर व्यवस्थापकाने दिले आहे.

        एकोणाचे माजी सरपंच महारत्न लोहकरे यांनी 12 जुलैला येथील उपविभागीय अधिकारी, ठाणेदार व वेकोलीचे उपक्षेत्रीय प्रबंधक यांना पत्र देऊन या रस्त्याचे काम पूर्ण करण्याची विनंती केली. बससेवा बंद झाल्याने वरोड्याला शिक्षणासाठी येणाऱ्या एकोणा येथील विद्यार्थी, विद्यार्थिनी व वृद्धांना बराच त्रास सहन करावा लागत आहे. 
         रस्त्याचे काम पूर्ण न केल्यास या रस्त्याने होणारी कोळशाची वाहतूक थांबविण्याचा इशारा माजी सरपंचांनी दिला आहे.

Comments