*फ्लॅगशीप योजनांच्या अंमलबजावणीचा जिल्हाधिका-यांकडून आढावा*

*फ्लॅगशीप योजनांच्या अंमलबजावणीचा जिल्हाधिका-यांकडून आढावा*

अकूंश अवथे चंद्रपूर 

चंद्रपूर, दि. 23 : राज्य शासनाने तरुण, तरुणी, महिला, वृध्द तसेच शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या अनेक योजना सुरू केल्या आहेत. यात मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री मोफत तीर्थदर्शन योजना आणि मुख्यमंत्री वयोश्री योजनांचा समावेश आहे. या महत्वाकांक्षी योजनांचा मंत्रालय स्तरावरून नियमित आढावा होत असल्याने चंद्रपूर जिल्ह्यात या योजनांच्या अंमलबजावणीचा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, मनपा आयुक्त विपीन पालिवाल, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, विशेष कार्य अधिकारी डॉ. विजय इंगोले, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत, जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) संग्राम शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त भैयाजी येरमे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, सामाजिक न्याय विभागाच्या प्रतिभा भागवतकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, शासनाच्या सर्व फ्लॅगशीप योजनांचा शासन स्तरावरून नियमित आढावा होत आहे. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे शासनाचे निर्देश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांनी याकडे गांभिर्याने लक्ष द्यावे. मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सर्व तहसीलदारांनी गती द्यावी. यासाठी तालुका स्तरावरील यंत्रणेची आठवड्यातून 1-2 वेळा बैठक घ्यावी.

युवकांना रोजगारक्षम बनविणे तसेच उद्योग आणि आस्थापनांना कौशल्यप्राप्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त युवकांना मिळण्यासाठी प्रयत्न करावा. पात्र युवक आणि उद्योगांनी कौशल्य विकास विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेंतर्गत 65 व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि वयोमानपरत्वे येणा-या शारीरिक व्याधींवर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साहित्य / उपकरण खरेदी करणे किंवा मनस्वास्थ केंद्राद्वारे प्रशिक्षण आदींसाठी एकवेळ एकरकमी 3 हजार रुपये लाभ मिळणार आहे. यासाठी सर्व तहसीलदारांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील पात्र वृध्दांना या योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करावा. तसेच शासनाने सर्वधर्मातील 60 वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन यात्रेची मोफत संधी उपलब्ध करून दिली आहे, असे जिल्हाधिका-यांनी सांगितले.

०००००००

Comments