*महिला प्रशिक्षणार्थींसोबत संवाद*
अकूंश अवथे चंद्रपूर
चंद्रपूर, दि. 20 : चंद्रपूर – मूल रोडवर असलेल्या स्वाधार महिला निवासगृहाला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी भेट देऊन येथे प्रशिक्षण घेत असलेल्या महिलांसोबत संवाद साधला. यावेळी चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत, बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, निवासगृहाचे व्यवस्थापक घनश्याम कामटकर, अधिक्षिका शारदा चट्टे, समुपदेशिका शारदा वाघमारे, शिवणकाम प्रशिक्षिका श्रीमती बुरडकर, जिल्हा कौशल्य विकास समन्वयक मुकेश गुंजनकर आदी उपस्थित होते.
कृष्ण नगर येथील स्वाधार महिला निवासगृहात 30 महिलांचे प्रशिक्षण सुरू असून सदर प्रशिक्षण हे साडेतीन महिन्यांचे आहे. या प्रशिक्षण केंद्राला जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी भेट देऊन येथील महिलांसोबत संवाद साधला. तुमचे नाव काय, कुठुन आलात, राहता कुठे, शिवणकाम प्रशिक्षण आवडले का, यानंतर काय करणार आहात, अशी विचारणा जिल्हाधिका-यांनी केली. यावर गोंदिया येथून आलेल्या वेदकी ब्राम्हणकर म्हणाल्या, आम्हाला प्रशिक्षणाची चांगली संधी मिळाली आहे, या प्रशिक्षणातून रोजगार मिळण्यास मदत होईल.
यावेळी अधिका-यांना सुचना करतांना जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, या स्वाधार महिला निवास गृहात महिलांचे पुनर्वसन आणि प्रवेश नियमित सुरू ठेवा. तसेच शासनाच्या मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी येथील सर्व महिलांचे अर्ज त्वरीत भरून घ्या. कागदपत्रांची कमतरता असेल तर ते तपासा व संबंधित कागदपत्रे महिलांना उपलब्ध करून द्या. येथील महिलांना लाडकी बहीण योजनेचा फायदा मिळण्यासाठी अधिकारी व कर्मचा-यांनी लक्ष द्यावे, अशाही सुचना त्यांनी केल्या.
००००००
Comments
Post a Comment