वेकोलिच्या खाणीतून भंगार चोरट्यांना मोकळे रान**माजरी येथील महत्त्वाच्या जागेवरून दोन सीसीटीव्ही कॅमेरे गहाळ*

*वेकोलिच्या खाणीतून भंगार चोरट्यांना मोकळे रान*

*माजरी येथील महत्त्वाच्या जागेवरून दोन सीसीटीव्ही कॅमेरे गहाळ*

अतुल कोल्हे भद्रावती :-
           तालुक्यातील माजरी गाव हे औद्योगिक क्षेत्र असून, येथे कोळसा खाणी आहेत. दरम्यान काही वर्षापूर्वी नागलोन या भूमिगत खाणीला खुल्या खाणीत परिवर्तीत करण्यात आला. त्यामुळे भूमिगत खाणीतील मोठ्या प्रमाणात भंगार असल्यामुळे भंगार चोरट्यांना अच्छे दिन आले असुन स्थानिक पोलीस या चोरट्यांना पाठीशी घालत असल्याचे आजवर दिसून आले आहे. 
           विशेष म्हणजे  काही दिवसांपूर्वी दि. १९ जुलै रोजी एका मारुती व्हॅन क्र. एमएच ०४ ए एक्स ४३९६ या वाहनातून भंगार चोरी करून नेताना पोलिसांनी पकडले होते. पोलीसांनी सदर वाहन पकडून ठाण्यात जमा केले. दहा दिवस लोटूनही मारुती व्हॅन मधील लोखंडी भंगार कुणाचे आहे, हे खात्री करण्यासाठी न्यायालयातून परवानगी मिळविण्यासाठी पोलीसांना मुहूर्तच भेटत नाही. माजरीतून भंगार लादून सदर वाहन बाहेर जात असेल तर याचा अर्थ असा की वेकोलिच्या खाणीतूनच चोरी झाली आहे. वेकोलिच्या प्रकल्पाशिवाय इतर कोणतेही प्रकल्प या क्षेत्रात नाही. 
चोरीच्या घटना सुरु असून काही दिवसांपूर्वी माजरीच्या मुख्य मार्गावरील दोन महत्वाच्या ठिकाण्याहुन सिसिटीव्ही कॅमेरे चोरी गेले. चोरी होवून अनेक दिवस झाले असले तरी  सिसिटीव्ही चोरून नेलेल्या आरोपींचा मात्र अजूनही सुगावा लागला नाही.
पोलीस ठाण्याचे काही कर्मचारी देखील या चोरट्यांच्या थेट संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. वेकोलिच्या खाणीत होणारी भंगार चोरी बाबत अनेक तक्रारी समोर आल्या असल्या तरी मागील  दिड दोन वर्षात एकही ठोस कारवाई झालेली नाही.
       सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरणारे पोलीस अधिकारी भंगार माफियांचा विषय हाती आल्यावर मात्र त्यांना कोणताही त्रास होणार नाही याकडे विशेष लक्ष देवुन असतात. नुकताच (दि. १३ जुलै) रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास वेकोलि माजरी क्षेत्राअंतर्गत कार्यरत एका खाजगी कंपनीच्या टाटा हिटाची या मशीनीच्या सुट्या भागाची चोरी झाली होती. दरम्यान त्या कंपनीचे सुरक्षा रक्षकांनी काही तासातच चोरट्याला पकडून पोलीस ठाण्यात नेले. मात्र त्या चोरीच्या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नाही. याच संधीचा फायदा घेत आरोपी या प्रकरणांतून निसटून गेला आहे.
          वेकोलिच्या खाणीतून चोरी करून मौल्यवान वस्तू आणल्या जातात. त्यामध्ये लोखंड, मशिनचे पार्ट, केबल, तांबा अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो.  वेकोलिच्या खाणीतून दररोज होत असलेल्या चोरीमुळे पोलीसांनी सोईस्कर पणे भंगार माफियांना मोकळीक दिली असल्याचे उघडकीस आले आहे. 
दरम्यान माजरी पोलीस ठाण्यात लोखंडी भंगार लादून जमा असलेले मारुती व्हॅनच्या मालकावर अदखलपात्र सारख्या लहान गुन्हा दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. जर पोलीसांनी मारुती व्हॅनने लोखंडी वाहतूक प्रकरणी सखोल चौकशी केली तर मोठा गुन्हा उघड होईल. आणि यात अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
माजरी परिसरातून दररोज मोठ्या प्रमाणात होणाऱ्या लोखंडी चोरीवर आळा घालण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Comments