*मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन*

*मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन*

अकूंश अवथे चंद्रपूर 

चंद्रपूर, दि. 19 : राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी साहित्य/उपकरणे खरेदी करणे यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना शासनाकडून एकवेळ एकरकमी 3 हजार रुपये देण्यात येणार आहे. या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करावे, असे आवाहन सामाजिक न्याय विभागाने केले आहे.
या योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता/दुर्बलतेनुसार चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपाड स्टिक, व्हील चेयर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची कमोड खुर्ची, नि-ग्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इ. सहाय्यभूत आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी पात्र वृद्ध लाभार्थ्यांना  एकवेळ एकरकमी 3 हजार रुपये लाभ प्रदान करण्यात येईल.

त्यानुषंगाने मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर या कार्यालयाकडे मागविण्यात येत आहे.

*लाभार्थ्यांच्या पात्रतेचे निकष :* सदर योजनेतंर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक (ज्या नागरिकांनी दि.31.12.2023 अखेर पर्यंत वयाची 65 वर्षे पूर्ण केली असतील, असे नागरिक पात्र समजण्यात येतील), ज्या व्यक्तींचे वय 65 वर्षे आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तींकडे आधार कार्ड, मतदान कार्ड आणि जन्माचा पुरावा असणे आवश्यक आहे. लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बीपीएल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत किंवा इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृध्दापकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा सादर करावा.
*उत्पन्न मर्यादा :* लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु. 2 लाखाच्या आत असावे. याबाबतचे लाभार्थ्यांने स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील. सदर व्यक्तीने मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसावे. याबाबतचे लाभार्थ्याने स्वयं घोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील.

*आवश्यक कागदपत्रे :* आधार कार्ड, मतदान कार्ड, T.C.,  राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स, 4 पासपोर्ट आकाराचे 2 फोटो,  अर्जासोबत जोडलेले उत्पन्नाचे स्वयंघोषणा पत्र आहे, उपकरण/साहित्याचे (दुबार लाभ न घेतल्याचे स्वयं घोषणा पत्र), तहसीलदार किंवा तलाठी यांचा उत्पन्न दाखला जोडण्याची आवश्यकता नाही. अर्जासोबत दिलेले स्वयं घोषणा पत्र जोडावे, लाभार्थ्याने उपकरण / साहित्य पावती जपून ठेवावी, अर्जासोबत जोडलेली सर्व कागदपत्रे स्वसाक्षांकित करून जोडावे.

*येथे करा संपर्क :* अधिक माहितीकरिता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, शासकीय दुध डेयरी जवळ, जलनगर वार्ड, चंद्रपूर किंवा मो.नं.9307409938 यावर संपर्क करावा.

सदर योजनेचे अर्ज चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तरी जेष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

Comments