स्त्रीसन्मान हेच भाजपा महिला मोर्चाचे लक्ष्य!**ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी रक्षाबंधन कार्यक्रमात दिला विश्वास**पोंभूर्णा येथे आयोजित कार्यक्रमाला बहिणींची लक्षणीय उपस्थिती*

*स्त्रीसन्मान हेच भाजपा महिला मोर्चाचे लक्ष्य!*

*ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी रक्षाबंधन कार्यक्रमात दिला विश्वास*

*पोंभूर्णा येथे आयोजित कार्यक्रमाला बहिणींची लक्षणीय उपस्थिती*

अकूंश अवथे चंद्रपूर 

*चंद्रपूर,दि.२० - महिला मोर्चाच्या सदस्यांनी एकमेकांना मदत करण्याचा संकल्प करावा. सरकारच्या सर्व योजना सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावा. एखादी महिला दुःखी असेल तर तिच्याजवळ समाधान घेऊन पोहोचणारी पहिली व्यक्ती भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाचीच असली पाहिजे. तरच आपण ‘एकच चर्चा महिला मोर्चा’ अशी घोषणा देऊ शकतो. स्त्रीसन्मान हेच भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाचे लक्ष्य असले पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.*

पोंभूर्णा येथील सुमन मंगल कार्यालयात भाजपा महिला मोर्चाच्या वतीने रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, प्रदेश महिला मोर्चा महामंत्री अल्का आत्राम, पोंभूर्णाच्या नगराध्यक्ष सुलभा पिपरे, नगर परिषद उपाध्यक्ष अजित मंगळगिरीवार, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वंदना शेंडे, चंद्रपूर महानगर महिला मोर्चाच्या अध्यक्ष सविता कांबळे, चंदू मारगोनवार, विनोद देशमुख, गुरुदास पिपरे, हरीश ढवस, शहर महिला मोर्चा अध्यक्ष वैशाली बोलमवार, गजानन मोडकुलवार यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

केंद्र व राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांचा यावेळी उल्लेख ना. श्री. मुनगंटीवार यांनी केला. जीवनदायी योजना, आयुष्यमान भारत, मातृवंदनासारख्या योजना सरकार राबवित आहे. याशिवाय देशगौरव पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी ८० कोटी लोकांना मोफत धान्य दिले. आता ग्रामीण भागात मुलींना सायकल देण्याची देखील योजना आहे, असे ते म्हणाले. बहिणींच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी भाजप परिवारातील प्रत्येक भाऊ त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहील, असा विश्वासही ना. श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी दिला. 

आज महाराष्ट्रात भाजपा महिला मोर्चाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्याचे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. बहिणींच्या पाठिशी भाऊ तर असणारच आहे, पण बहिणींच्या पाठिशी बहिणींनाही खंबीरपणे उभे राहायचे आहे. बहिणींच्या पाठिशी पूर्ण शक्तीनिशी उभे राहायचे आहे, असे आवाहनही त्यांनी केले. ते म्हणाले, ‘लाडकी बहीण योजनेंतर्गत २ लक्ष ८१ हजार बहिणींच्या खात्यात २ महिन्यांचे ३ हजार रुपये आले आहेत. काही पक्ष, दुष्ट बुद्धीचे आणि सत्तेसाठी हपापलेले लोक आता निवडणूक तोंडावर आल्यामुळे बाहेर निघाले आहेत. ते कधीही गरिबांना कुठलीच योजना देऊ शकत नाहीत. ४ वर्ष झोपलेले असतात. आता त्यांचे पोट दुखत आहे. बहिणींच्या मनात भिती निर्माण करण्याचे काम करत आहेत. त्यांनी कितीही उड्या मारल्या तरीही ही योजना आमचे सरकार आहे तोपर्यंत कधीच बंद होणार नाही. दुसऱ्या कुणी प्रयत्न केला तर चंद्रपूरचा वाघ म्हणून पहिली डरकाळी मी फोडेन.’ त्यांचा दिल्लीचा नेता आला तरीही योजनेला धक्का पोहोचू शकत नाही, असेही ना. मुनगंटीवार म्हणाले. 

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात आपण लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ केला. रक्षाबंधनाच्या दिवशीच पैसे देणार होतो. पण महाराष्ट्रातील १ कोटी २४ लाख बहिणींच्या खात्यात पैसे पोहोचायला ४८ तास लागतील. त्यामुळे १५ अॉगस्टलाच सुरुवात केली आणि रक्षाबंधनाच्या आधीत बहिणींच्या खात्यात पैसे यायला लागले, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
 कोणत्याही जातीची बहीण असेल जात-पात महत्त्वाची नाही. गरीब असेल आणि तुमच्या मुलीची इंजिनियर, डॉक्टर होण्याची क्षमता असेल तर शंभर टक्के फी सरकार भरणार आहे, असे ना. श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले. 

हा पैसा तुमच्या अडिअडचणीत कामात येईल. मुलाला बरं नसेल तर औषध आणायला नवऱ्याची वाट बघायची गरज नाही. मुलाला आईस्क्रीम खाऊ घालायचे असेल तर नवऱ्याची वाट बघावी लागणार नाही. मोबाईलवर रिचार्ज मारायला पतीवर अवलंबून राहायची गरज नाही. आईची आठवण आलीच आणि माहेरी जायचं असेल तर महिलांसाठी बसचे अर्धे तिकीट लागणार आहे. त्यामुळे आता आईला भेटण्यासाठी देखील महिलांना कुणावर अवलंबून राहण्याची गरज नाही, अशा भावना ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.

*स्त्रीचा सन्मान महाराष्ट्राचा सन्मान*
आता शेवटच्या बहिणीपर्यंत १५०० रुपये पोहोचविण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. यात्रा करून जनजागृतीचे काम सुरू झाले आहे. सर्व योजना त्यांच्यापर्यंत घेऊन जायच्या आहेत. महिला कुटुंबाची जबाबदारी घेते. पोषण करण्याची जबाबदारी ती पार पाडते. ९९ टक्के घटस्फोटांच्या प्रकरणात बाप आपल्या मुलांना टाकून जातो. पण स्त्री कुटुंबाची, मुलांची जबाबदारी कधीही विसरत नाही. त्यामुळे स्त्रीचा सन्मान झालाच पाहिले. स्त्रीचा सन्मान हा महाराष्ट्राचा सन्मान आहे, असे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.  

*जिथे असेल महायुती तिथे बहिणींना नाही भीती*
विविध योजना महिलांसाठी राबविण्याचा निर्णय आपण केला आहे.महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी जिल्ह्यामध्ये कॉल सेंटर निर्माण करतोय. राज्य सरकारने घरकुल योजना सुरू केली आहे. आज खात्यात १५०० रुपये आलेत. महायुतीचे सरकार टप्प्याटप्प्याने या रकमेत वाढ करेल. जिथे असेल महायुती तिथे आपल्या बहिणींना नाही भीती,’ असा विश्वास ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

*हा भाऊ सतत सोबत राहील*
पोंभुर्णा येथील बहिणींनी यावेळी ना.मुनगंटीवार यांना राखी बांधली. बहिणींच्या हक्कासाठी,संरक्षणासाठी आणि उत्कर्षांसाठी हा भाऊ सतत सोबत राहील ही ग्वाही ना.मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.

Comments