*सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जयंती उत्सव शासन स्तरावर साजरा होणार**महानुभाव पंथीय यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन : चक्रधर स्वामी यांचे तैलचित्र भेट*

*सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जयंती उत्सव शासन स्तरावर साजरा होणार*

*महानुभाव पंथीय यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन : चक्रधर स्वामी यांचे तैलचित्र भेट*

अतुल कोल्हे भद्रावती :-
             महाराष्ट्र शासनाच्या दि. १८ जानेवारी २०२४ चे परिपत्रकानुसार सन २०२४ पासून परमेश्वर अवतार महानुभाव पंथाचे प्रवर्तक भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतारदिन जयंती भाद्रपद शुद्ध द्वितीया रोज गुरूवार दिनांक ०५ सप्टेंबर २०२४ रोजी शासन स्तरावर साजरी करण्यात येत आहे.
          शासनाचे परिपत्रकानुसार सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय आदी स्तरावर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जयंती साजरी करण्यात यावी, याकरिता चंद्रपूर जिल्हा महानुभाव पंथीय भक्तगणातर्फे कविश्वर कुळभुषण पू.म.आचार्य श्री एकोबासबाबा वसंतराज शास्त्री, चंद्रपूर यांनी भक्तगणांसह विनयजी गौडा साहेब जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना त्यांचे कार्यालयात जाऊन दि. २ जुलै २०२४ रोजी निवेदन सादर केले. त्याच बरोबर सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींचे एक तैलचित्र ही भेट दिले.
            परब्रम्ह परमेश्वर अवतार तथा महानुभाव पंथ प्रवर्तक सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांनी ८०० वर्षांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राभर पायी परिभ्रमण करून तळागाळातील जनतेला ज्ञानामृत दिले. स्वातंत्र्य, समता, बंधुता, अहिंसा, सहिष्णुता इत्यादी नितीमुल्यांचा जनतेला उपदेश केला.  जात-पात, स्पृश्या-स्पृश्य, भेदभाव दूर करण्यासाठी श्री चक्रधर स्वामींनी समाजक्रांती केली. दारू-मांसाहारादी सप्त व्यसनापासून दूर राहण्याचा अतिशय महत्त्वपूर्ण उपदेश श्री चक्रधर स्वामींनी जनतेला दिला.
             "महाराष्ट्री असावे'' असा महाराष्ट्राचा आद्य गौरव करणारे श्री चक्रधर स्वामी यांचे महाराष्ट्र व मराठी भाषेवर अपार प्रेम होते. म्हणूनच महामहिम विद्वान श्री महाइंभट यांनी 'लिळाचरित्र' नावाचा मराठी भाषेचा आद्यग्रंथ लिहिला, मराठी भाषेची आद्य कवयित्री 'महदंबा' ही श्री चक्रधर स्वामींची शिष्या, 'ढवळे' हा काव्यग्रंथ मराठी भाषेत प्रसिध्द आहे.
जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन देताना महानुभाव पंथाचे सद्भक्त हेमंत सरोदे, श्रीदत्त मंदिर साठगांव चे संचालक विनोद गावंडे, नगरपरिषद मुल चे उपाध्यक्ष नंदूभाऊ रणदिवे, महंत कृष्णदास दर्यापूरकर, भुजंगराव चुनडे आदी महानुभाव पंथीय मंडळी उपस्थित होते.

Comments