सिंधी साहित्याचे देशाच्या प्रगतीत मोठे योगदान**सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे गौरवोद्गार**महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीचे पुरस्कार प्रदान*

*सिंधी साहित्याचे देशाच्या प्रगतीत मोठे योगदान*

*सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे गौरवोद्गार*

*महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीचे पुरस्कार प्रदान*

चंद्रपूर,दि.०८ - आपण सनातन संस्कृतीत ऋग्वेदाचा उल्लेख करतो. या महान ग्रंथात सिंधू आणि सिंध या शब्दांचा नऊवेळा उल्लेख आहे. ही एक महान संस्कृती आहे. त्यामुळेच सिंधी संस्कृतीचा उल्लेख होतो तेव्हा पर्यायाने राष्ट्रभक्तीचाही उल्लेख होतो. या समाजाने निर्माण केलेल्या साहित्याचे देशाच्या प्रगतीत मोठे योगदान आहे. या साहित्यातील संदेश, त्यातील भाव आणि आशय समाजाच्या विविध घटकापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी साहित्य अकादमीची आहे, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीचा 2023-24 चा पुरस्कार सोहळा 5 सप्टेंबर 2024 ला चंद्रपूर येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार किशोर जोगरेवार, सिंधी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष महेश सुखरामानी, भारतीय सिंधू सभेचे माजी अध्यक्ष लधाराम नागवानी, राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषदेचे सदस्य राम जवाहरानी, पुज्य सिंधी सेवा समितीचे सुरेश हरीरामानी, लालजी पंजाबी, राजकुमार जग्यासी, ग्यानचंद टहलीयानी, सिंधी साहित्य अकादमीचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. 

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘गंगेच्या किनाऱ्यावर ज्ञान प्राप्त करता येते. यमुनेच्या किनाऱ्यावर प्रेम आणि भक्तीचा संगम बघायला मिळतो आणि सिंधू नदीच्या किनाऱ्यावर मानवतेची संस्कृती बघायला मिळते. सिंधी समाज हा सभ्यतेचे प्रतिक आहे, यासाठी कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. आपण कोणत्याही जातीचे असलो तरीही राष्ट्रगितामध्ये ‘पंजाब, सिंध, गुजरात, मराठा’ असे म्हणतोच. राष्ट्रभक्तीचे धडे आपल्याला शाळेतच मिळतात. मी ज्या पक्षात आहे, तिथे तर लहानपणापासून अटलजी -अडवाणीजी यांचे नारे लावत मोठा झालो. अडवाणीजींचे देशभक्तीने ओतप्रोत शब्द मी ऐकले आहेत. माझ्यावर त्याचे संस्कार झाले आहेत,’ याचाही श्री. मुनगंटीवार यांनी आवर्जून उल्लेख केला. 

‘या जगातील सर्वांत पहिले पोर्ट (बंदर) सिंधी समाजाच्या एका व्यक्तीने बनविले. आपण ज्या इंडस व्हॅलीबद्दल, सिंधी संस्कृतीबद्दल बोलतो त्याच संस्कृतीत अर्थव्यवस्थेतील पहिले नाणे बनवताना भगवान महादेवाच्या ओमला चिन्हित करण्याचे काम सिंधी समाजाने केले आहे,’ असेही ते म्हणाले. ‘मी पहिल्यांदा १९९५ ला विधानसभा निवडणूक जिंकलो त्या विजयात सिंधी समाजाचाही वाटा आहे. असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.  

*संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने पुरस्कार*
आज वितरीत होणारे पुरस्कार सांस्कृतिक कार्य विभागातर्फे किंवा राज्य सरकारच्या सिंधी साहित्य अकादमीतर्फे देण्यात येत आहेत, असे भाव मनात ठेवू नका. हा पुरस्कार चांदा ते बांदा, गडचिरोली ते गडहिंग्लज आणि भामरागड चे रायगडपर्यंत ३ लाख ७ हजार ७१३ चौरस किलोमीटर क्षेत्रात राहणाऱ्या साडेतेरा कोटी महाराष्ट्रवासीयांच्या वतीने दिला जात आहे, या भावनेने स्वीकार करावा, असे आवाहन देखील त्यांनी केले.

*सिंधू संस्कृतीचे जगाला आकर्षण*
सिंधी साहित्य अकादमीची निर्मिती यासाठी की सिंधी साहित्याचा, सिंधू संस्कृतीचा संदर्भ पाच हजार वर्षांपूर्वीपासून होत आहे. संपूर्ण जग इंडस-व्हॅलीच्या सभ्यतेवर संशोधन करत आहे. संत झुलेलाल, वरुण देव आणि जलदेवतेची पुजा करणारी ही संस्कृती आहे, याचाही त्यांनी उल्लेख केला. 

*चंद्रपूरचा अभिमान*
माझा जिल्हा देशाच्या नकाशात उठून दिसावा, यासाठी मी सदैव प्रयत्नशील असतो. या जिल्ह्यातील सैनिक स्कूल सर्वांत उत्तम. वन अकादमीला थ्री स्टारचा दर्जा मिळाला आहे. देशात कुठेही वन अधिकाऱ्याची नियुक्ती झाली की त्याचे प्रशिक्षण चंद्रपूरला व्हावे असा निर्णय झाला आहे. देशाची अस्मिता असलेल्या प्रभू श्रीरामाच्या अयोध्येतील मंदिराचे दरवाजे चंद्रपूरच्या सागवन काष्ठापासून तयार झाले आहेत. संसद भवनातील दरवाजे चंद्रपूरच्या सागवन काष्ठापासून तयार झाले आहेत. एवढेच नव्हे तर लंडनला जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे भारतात आणण्याचे भाग्यही चंद्रपूरलाच लाभले आहे.  आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यालय, त्यांची खुर्ची, कॅबिनेट हॉल, हे सुद्धा चंद्रपूरच्याच लाकडापासून तयार होत आहे. चंद्रपूरची मान अभिमानाने उंचावणार आहे, अशी भावना श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. 

*पुरस्कारांची रक्कम दुप्पट*
सिंधी साहित्य अकादमीच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची रक्कम पुढच्या वर्षीपासून दुप्पट करण्यात येईल, अशी घोषणा मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी केली. सिंधी साहित्याला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेत आहे. जोपर्यंत माझ्या हातात अधिकार आहेत मी सिंधी समाजाच्या सोबत उभा राहील, असा विश्वासही मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिला.

*असे आहेत पुरस्कार*
*अखिल भारतीय जीवन गौरव पुरस्कार - नंदलाल छुगानी (१ लक्ष रुपये)*
*वाङ्‍‍मय पुरस्कार-*  १. डॉ. भारत खुशालाणी २. कोमल सुखवानी ३. प्रिया वछाणी ४. हासानंद सतपाल (प्रत्येकी ५० हजार रुपये) *पत्रकारिता पुरस्कार* - विनोद रोहाणी (२५ हजार रुपये) *अनुवाद पुरस्कार* - जुली तेजवानी (२५ हजार रुपये) *काव्य पुरस्कार* - जीवन वाधवानी (२५ हजार रुपये) *नवोदित साहित्यिक पुरस्कार* - सोना खत्री (२५ हजार रुपये)
00000

Comments