रोटरी क्लब चा अभिनव उपक्रम "निर्माल्य संकलन

रोटरी क्लब चा अभिनव उपक्रम "निर्माल्य संकलन"

*वरोरा रोटरी क्लब व आनंदवन मित्र मंडळ जपत आहे खरे सामाजिक व पर्यावरणीय कर्तव्य.

निर्माल्य ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत किंवा टाक्यात जमा करण्याचे आवाहन.

वरोरा 
फक्त बातमी 

 सार्वजनिक गणेशोत्सवा दरम्यान शहरात होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी तसेच पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाचे महत्त्व पटवून देण्यासाठी रोटरी क्लब, वरोरा व आनंदवन मित्र मंडळ, वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने " निर्माल्य संकलन "  उपक्रम राबविण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील  महर्षी वाल्मिकी प्रवेशद्वारा लगत  निर्माल्य संकलन वाहनांच्या माध्यमातून ' निर्माल्य संकलन '  सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमाचा शुभारंभ येथील उपजिल्हा रुग्णालयचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रफुल्ल खुजे यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला.


     याप्रसंगी रोटरी क्लब वरोराचे अध्यक्ष बंडू देऊळकर, सचिव अभिजित मणियार, दामोदर भासपले,  राहुल पावडे, मनोज जोगी, आनंदवन मित्र मंडळ, वरोरा अध्यक्ष डॉ. प्रवीण मुधोळकर , सचिव राजेंद्र मर्दाने, राहुल देवडेे, रवींद्र नलगिंटवार, खेमचंद नेरकर, विवेक बर्वे,भास्कर गोल्हर, प्रवीण सुराणा प्रामुख्याने उपस्थित होते.

     डॉ. खुजे म्हणाले की, रोटरी क्लब वरोरा व आनंदवन मित्र मंडळ वरोरा तर्फे स्तुत्य उपक्रम राबवून गौरी - गणपतीच्या आरती व पुजेनिमित्त गोळा होणाऱ्या निर्माल्याची योग्यरीत्या विल्हेवाट लावण्यासाठी वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. गौरी - गणपती विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांनी  निर्माल्य संकलन वाहनाचा वापर करुन पर्यावरण संरक्षणाला हातभार लावावा, असे आवाहनही त्यांनी केले. 
    रोटरी अध्यक्ष बंडूभाऊ देऊळकर म्हणाले ,
 " गणेशाचे स्वागत करुया वाजत गाजत, करुया पर्यावरणाच्या फुलांनी सजावट" या  पर्यावरण पूरक संकल्पनेतून उपक्रम राबवून  नागरिकांना निर्माल्य दान करण्याचे आवाहन केले.
    मर्दाने म्हणाले की, गणेशोत्सव दरम्यान फुले, पत्री, दुर्वा, पुजा सामुग्री आदींचा वापर होतो. त्यानंतर निर्माल्य नदी, तलावात  विसर्जित करण्याची परंपरा आहे.परंतु त्यामुळे जलप्रदूषण होते,हे लक्षात घेऊन नागरिकांनी निर्माल्य, कचरा किंवा इतर साहित्य पाण्यात टाकू नये. विसर्जनस्थळी खास असलेल्या निर्माल्य संकलन वाहनात अथवा टाकीत जमा करावा,असे आवाहन त्यांनी केले.
         यावेळी मंडळाच्या आवाहनाला प्रतिसाद देत हरितालिका विसर्जनासाठी आलेल्या महिलांनी निर्माल्य संकलन वाहनात निर्माल्य जमा केले.
      याप्रसंगी रोटेरियन सर्वश्री राहुल डोंगरवार, मनोज कोहळे, विनोद नंदुरकर,शब्बीर भाई, अदनान सिद्धी कोट, मकरंद डुंबरे,देवानंद गावंडे यांच्यासह मोठ्या संख्येने जागरूक नागरिकांची उपस्थिती होती.

Comments