*पोलीस नागरिकांचे मित्रच* *पोलीस व समाज यात सुसंवाद असावा:जिल्हा पोलीस अधीक्षक*

*पोलीस नागरिकांचे मित्रच*
 *पोलीस व समाज यात सुसंवाद असावा:जिल्हा पोलीस अधीक्षक* 

वरोडा, शाम ठेंगडी 

      पोलीस हे आपले सहकारी मित्र आहेत त्यांच्याशी सुसंवाद ठेवा.पोलीस आपल्या कार्यक्रमात अडचणी निर्माण करण्यासाठी नाही,तर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत आपणस संरक्षण देण्यासाठी आहेत. नागरिकांनी सामाजिक सलोखाराखत व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत आपले उत्सव साजरे करावेत असे आवाहन जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमूक्का यांनी वरोडा येथे काढले. 
       येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयाच्या सभागृहात ४ सप्टेंबर रोज बुधवारला झालेल्या  शांतता समितीच्या सभेत ते बोलत होते.
          आगामी काळात येणाऱ्या ईद मिलाद व गणेशोत्सव या सारख्या सणांबाबत दरोडा व भद्रावती तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
         यावेळी व्यासपीठावर जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू ,खासदार प्रतिभा धानोरकर, येथील उपविभागीय अधिकारी झेनित चंद्रा, उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम यांचे सह तहसीलदार योगेश कौटकर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी गजानन भोयर,विद्युत वितरणचे बदखल, भद्रावती न.प.च्या मुख्याधिकारी विशाखा शेळके इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
        नागरिकांनी ईद व गणेशोत्सवाच्या काळात प्रशासनाला सहकार्य करावे. सण शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाच्या दिलेल्या सूचनांचे पालन केल्यास आपणावर कारवाई करण्याची वेळ येणार नाही असे उद्गार यावेळी उपविभागीय अधिकारी झेनिथ चंद्रा यांनी व्यक्त केले.
         सण साजरे करताना दुसऱ्या समाजाच्या किंवा व्यक्तीच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेत तसे वर्तन करावे असे सांगत जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांनी या सणांच्या काळात पोलीस  विभागाच्या सूचना सर्वांसमोर विषद केल्या.
     वरोडा हे एक ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव असून येथे सर्व समाजाचे लोक एकत्र येऊन ईद गणेशोत्सवा सारखे सण साजरे करतात. या काळात आपल्या गावाच्या या लौकीकाला गालबोट लागू नये. यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी, गणेश मंडळ,ईद मिलाद कमिटी, शांतता समिती व नागरीक या सर्वांनी जबाबदारीने वागून काम करण्याची गरज असल्याचे मत खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी यावेळी व्यक्त केले. 
              या सभेला वरोडा व भद्रावती तालुक्यातील पोलीस पाटील,गणेश मंडळाचे पदाधिकारी, पत्रकार, महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
       यांनी कार्यक्रमाचे संचलन पोलीस उपनिरीक्षक उमेश नासरे  यांनी तर प्रास्ताविक पोलीस उपनिरीक्षक अनिल मेश्राम यांनी केले. नयोमी साटम यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांनी सभेचे संपूर्ण आयोजन चोखपणे केले.

Comments