*हजारो भाविकांनी घेतला अनुप जलोटा यांच्या भक्तीरसाचा आस्वाद, महाकाली महोत्सवात भक्तिगीतांचा गजर*

*हजारो भाविकांनी घेतला अनुप जलोटा यांच्या भक्तीरसाचा आस्वाद, महाकाली महोत्सवात भक्तिगीतांचा गजर*

*999 मायमाउलींचा सत्कार, नृत्य जल्लोषासह, महिलांचे कवी संमेलन संपन्न*

अकूंश अवथे चंद्रपूर 

चंद्रपूर: श्री माता महाकाली महोत्सवात प्रसिद्ध भजनसम्राट अनुप जलोटा यांच्या भक्ती संगीत कार्यक्रमाने भाविकांची मने जिंकली. या विशेष कार्यक्रमात अनुप जलोटा यांनी आपल्या सुरेल आणि भक्तीमय गायनाने उपस्थित हजारो भाविकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार आणि श्री महाकाली माता महोत्सव ट्रस्टच्या वतीने अनुप जलोटा यांचा मातेची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी तेलंगाणा राज्यातील कागजनगर येथील आमदार पालवाई हरीश बाबू, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, अजय जैयसवाल चंदू वासाडे  यांच्यासह श्री माता महाकाली महोत्सव ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
  कार्यक्रमाच्या सुरुवातीला अनुप जलोटा यांच्या हस्ते माता महाकालीची विधिवत पूजा आणि आरती करण्यात आली. त्यानंतर त्यांनी ‘अच्युतम केशवम’ सारख्या भक्तिगीतांपासून विविध भजनांपर्यंत एकापेक्षा एक सादरीकरणे केली. त्यांच्या आवाजातील माधुर्य आणि भक्तीमय भावनेने उपस्थित भाविकांना आध्यात्मिक आनंदाची अनुभूती दिली. कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांसह माताच्या भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
महाकाली महोत्सवाच्या मंचावर 8 तारखेला 999 जेष्ठ मायमाउलींचा सन्मान करण्यात आला. दुपारी 1 वाजता जागर कवितेचा हा महिला कवी संमेलन सोहळा कवीप्रेमींच्या उपस्थितीत पार पडला. दुपारी 2 वाजता स्थानिक कलावंतांनी नृत्य सादर करत रसिकांची मने जिंकली.

उद्याचे कार्यक्रम
सकाळी 9 वाजता महेश भवन मंडळाच्या वतीने आयोजित भजन कार्यक्रमाने तिसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. सकाळी 11 वाजता लखमापूर मंदिराच्या वतीने सुंदरकांडचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 1 वाजता सायबर सेलच्या वतीने महिलांना मार्गदर्शन केले जाईल. दुपारी 2 वाजता राणी हिराई विद्यार्थी मंचाच्या वतीने शिव्या मुक्त समाज अभियान जागरूकता कार्यक्रम पार पडेल. सायंकाळी 5 वाजता माता महाकालीची आरती तर संध्याकाळी 6 वाजता "मेरा भोला है भंडारी" या प्रसिद्ध गाण्याचे सुप्रसिद्ध गायक हंसराज रघुवंशी यांच्या भक्तीमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

गोल्डन बॉईजने भरली रंगत
गोल्डन बॉईज म्हणून राज्यात प्रसिद्ध असलेल्या पुणे येथील सनी वाघचौरे आणि संजय गुजर यांनी महाकाली महोत्सवात ग्रँड एंट्री करत कार्यक्रमात रंगत आणली. या गोल्डन बॉयला पाहण्यासाठी युवकांनी मोठी गर्दी केली होती. माता महाकाली महोत्सवाचे संयोजक आमदार किशोर जोरगेवार यांनी या दोघांचे मातेची मूर्ती देऊन स्वागत केले.

Comments