डॉ. संजय साबळे यांना गोंडवाना विद्यापीठाचा 'उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार'

डॉ. संजय साबळे यांना गोंडवाना विद्यापीठाचा 'उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार'

वरोरा. दि. 8/10/2024.

महारोगी सेवा समिती, वरोरा संचालित आनंद निकेतन विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, आनंदवन-वरोरा येथील ग्रंथपाल व अधिसभा सदस्य डॉ. संजय नारायणराव साबळे यांची नुकतीच गोंडवाना विद्यापीठाच्या पहिल्या पद्मश्री डॉ.एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कारासाठी निवड झाली आहे. 

प्रस्तुत पुरस्कार गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित समारंभात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मा.डॉ.मिलिंद बारहाते यांचे शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच त्यांना प्रदान करण्यात आला. या समारंभास गोंडवाना विद्यापीठाचे मा.कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे, माजी कुलगुरू डॉ.विजय आईंचवार, कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण तसेच व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आदि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ व दहा हजार रुपये  असे पुरस्काराचे स्वरूप असून डॉ. संजय साबळे यांनी पुरस्काराची रक्कम महारोगी सेवा समिती, आनंदवन या संस्थेस देणगीदाखल सुपुर्द केली आहे. 

 गेल्या 31 वर्षांपासून डॉ.संजय साबळे आनंद निकेतन महाविद्यालयात कार्यरत असून वाचकप्रिय तसेच प्रयोगशील ग्रंथपाल म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. आनंद निकेतन महाविद्यालयाच्या प्रशस्त, सुसज्ज व समृद्ध ग्रंथालयाच्या विकासात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. मराठी वाचक स्पर्धा, वैशिष्ट्यपुर्ण विषयांवर ग्रंथप्रदर्शनांचे आयोजन तसेच वाचनसंस्कृती वृद्धींगत व्हावी यासाठी विविध उपक्रमांचे नियमित आयोजन ते करीत असतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ महाविद्यालयीन ग्रंथपाल संघटनेच्या 'MUCLA - Librarian of the Year 2010'  या पुरस्काराने ते यापूर्वी सन्मानित झाले आहेत.

महारोगी सेवा समितीचे सचिव मा.डॉ.विकासभाऊ आमटे, मा.प्राचार्य डॉ.मृणाल काळे, समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद तसेच विविध  क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्काराने प्राप्त झाल्याबद्दल डॉ.संजय साबळे यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

Comments