राजस्थान येथे तयार झालेल्या दुमजली माता महाकालीच्या रथाचे राज्यपाल यांच्या हस्ते विधिवत पूजन.**रथामधून माता महाकालीची निघणार नगर प्रदक्षिणा.*

*राजस्थान येथे तयार झालेल्या दुमजली माता महाकालीच्या रथाचे राज्यपाल यांच्या हस्ते विधिवत पूजन.*

*रथामधून माता महाकालीची निघणार नगर प्रदक्षिणा.*

अकूंश अवथे चंद्रपूर 

श्री माता महाकाली महोत्सवाच्या दरम्यान 10 ऑक्टोबर रोजी श्री माता महाकालीची नगर प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. यात राजस्थान येथील जयपूर  येथे तयार झालेल्या रथातून माता महाकालीची मूर्ती नगर प्रदक्षिणेत सहभागी होणार आहे. या रथाचे राज्याचे राज्यपाल सि. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर रथ श्री महाकाली माता ट्रस्टतर्फे महाकाली मंदिराला सुपूर्त करण्यात आला.
  यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री, वनमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, श्री माता महाकाली महोत्सवाचे संयोजक आमदार किशोर जोरगेवार, सचिव अजय जयस्वाल, विश्वस्त सुनील महाकाले, कोषाध्यक्ष पवन सराफ, श्यामसुंदर धोपटे, राजेंद्र शास्त्रकार, मिलिंद गंपावार, जयश्री कापसे गावंडे, मनीषा पडगीलवार, वंदना हातगावकर, सविता दंढारे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
  चंद्रपूरात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री माता महाकाली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 7 ऑक्टोबरपासून सदर महोत्सवाला सुरुवात होणार असून, याची जय्यत तयारी चंद्रपूरात सुरू झाली आहे. यंदा प्रथमच नगर प्रदक्षिणेत मातेची मूर्ती रथामधून नेण्यात येणार आहे, आणि हा भव्य आणि सुंदर रथ राजस्थान येथे तयार करण्यात आला आहे. काल राज्याचे राज्यपाल महामहिम सि. पी. राधाकृष्णन चंद्रपूर दौऱ्यावर असताना त्यांनी माता महाकाली मंदिरात दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते माता महाकाली महोत्सवासाठी राजस्थान येथे तयार करून आणलेल्या रथाचे विधिवत पूजन करण्यात आले.
हा रथ तयार करण्यासाठी पाच महिन्यांचा कालावधी लागला असून, सदर रथ 17 फूट उंचीचा आहे, तर या रथाची लांबी 22 फूट आहे. रथावर माता लक्ष्मी आणि माता महाकालीच्या शक्तीचे प्रतीक असलेली सिंहाची मूर्ती साकारण्यात आली आहे. तसेच यावर पोतराजे आणि मातेचे सिंहासन आहे. हा रथ दोन मजली असून, महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.
यावेळी बोलताना राज्यपाल म्हणाले की, "माता महाकाली ही शक्तीचे केंद्र आहे. येथे आल्यावर सकारात्मक ऊर्जेचा संचार झाला. असे महोत्सव धार्मिक एकतेसाठी आवश्यक आहेत. यातून चंद्रपूरची नवी ओळख निर्माण होणार आहे." यावेळी श्री महाकाली माता ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांसह माता भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Comments