*पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला विश्वास*
*चंद्रपूर येथे स्व. डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार मेमोरीयल महाराष्ट्र मिनी स्टेट बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन*
अकूंश अवथे चंद्रपूर
चंद्रपूर, दि. 6 : महाराष्ट्राचे वर्णन ‘चांदा ते बांदा’असे केले जाते. त्यातच ही वाघांची भूमी आहे. वाघ हे पराक्रमाचे प्रतिक आहे. त्यामुळे येथील खेळाडू हा वाघासारखाच पराक्रम गाजविणारा असावा. यासाठी आपण जिल्ह्यात खेळाडूंसाठी अनेक दालने उभी करण्याचा निर्धार केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडू राज्य, राष्ट्रीय स्तरावर आणि पुढे ऑलम्पिकमध्ये उंच भरारी घ्यावी, यासाठी आपण कायम प्रयत्नशील आहोत. खेळाडूंच्या प्रगतीसाठी आपण सदैव तत्पर राहू, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
चंद्रपूर येथील बॅडमिंटन हॉलमध्ये जिल्हा बॅडमिंटन विकास असोसिएशनच्या वतीने स्व. डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार मेमोरीयल महाराष्ट्र मिनी स्टेट बॅडमिंटन निवड स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन करतांना पालकमंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, जिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, जिल्हा बॅडमिंटन विकास असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश चांडक, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष मंगेश काशीकर, उपाध्यक्ष राज पुरोहित, जगदीश जोशी, प्रदीप गवारा, मोहन शहा, रणजीत माथु, नागोजी चिंतलवार, अनिरुद्ध जोशी आदी उपस्थित होते.
अतिशय उत्तम वातावरणात या बॅडमिंटन स्पर्धा होईल, असा विश्वास व्यक्त करून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, पंचाचा निकाल प्रतिकूल वाटला तरी प्रत्येक खेळाडूंनी डोकं शांत ठेवून निर्णय स्वीकारावा. चंद्रपूर जिल्हा बॅडमिंटन विकास असोसिएशनने अतिशय कमी वेळात राज्यस्तरीय स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केले आहे. स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या संघटनांमागे शासन आणि प्रशासन नेहमीच पाठीशी राहील. राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्याकडे क्रीडा विभागाचा प्रस्ताव गेल्यास ते लगेच मान्य करतात. आपला शब्द खाली पडू देत नाही. त्यामुळे क्रीडा विभागाच्या सर्व सोयीसुविधा जिल्ह्यात उपलब्ध होतात, याचा फायदा येथील विविध क्रीडा संघटनांनी घ्यावा असे मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले.
चंद्रपूर जिल्हा हा गोंड राजा, राणी दुर्गावती, राणी हिराई यांच्या वीरतेचे आणि शुरतेचे प्रतीक आहे. त्यामुळे मैदानातही खेळाडूंनी पराक्रम दाखवावा, आंतरराष्ट्रीय स्तराच्या या वातानुकूलीत बॅडमिंटन सभागृहाला आणि स्टेडियमला सोलरवर करण्यात येईल. आपल्या जिल्ह्यात क्षमतेची आणि पराक्रमाची कुठेही कमतरता नाही. छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र असल्यामुळे एक नवी उर्जा आपल्याला प्राप्त होते. आपण नेहमी मतांपेक्षा सर्वांगीण विकासालाच चालना दिली आहे. जिल्ह्यातील बॅडमिंटन कोर्ट, स्टेडियम अत्याधुनिक करण्यात आले आहेत. चंद्रपूरच्या सैनिक शाळेत नुकतीच देशभरातील सैनिक शाळांची ‘स्पोर्ट मीट’ पार पडली. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे, असेही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
यावेळी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू माधवी काशीकर हेडाऊ यांचा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
*पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्यामुळेच जिल्ह्यात उत्तम दर्जाच्या क्रीडा सुविधा : जिल्हाधिकारी विनय गौडा*
यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. म्हणाले, चंद्रपूर शहरातील वातानुकूलित नवीन बॅडमिंटन हॉलमध्ये राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या भक्कम पाठपुराव्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात उत्तम दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. चंद्रपुरातून सुद्धा उत्कृष्ट खेळाडू तयार झाले पाहिजे. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चंद्रपुरचे खेळाडू नक्कीच पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविकात जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश चांडक म्हणाले, गत १० वर्षात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यात अनेक विकासाची कामे झाली असून ताडोबा हे जगाच्या नकाशावर आले आहे. स्पर्धेकरीता येथे आलेल्या सर्व खेळाडूंना ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात मोफत सफारी करण्याचा निर्णय पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घोषित केला. चंद्रपुरात अत्याधुनिक बॅडमिंटन हॉलची निर्मिती करण्यात आली आहे. म्हाडाच्या जागेवर चंद्रपुरात उभारण्यात येणाऱ्या नवीन इनडोअर स्टेडियममध्ये पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे दहा वातानुकूलित बॅडमिंटन कोर्ट तयार होत आहे. स्वर्गीय डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार मेमोरियल महाराष्ट्र मिनी स्टेट बॅडमिंटन निवड स्पर्धेकरिता राज्यभरातील 520 खेळाडू आले असल्याचे गिरीश चांडक यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन निशा मेहता यांनी तर आभार जोवेल चांदेकर यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने स्पर्धेकरीता आलेले खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, पालक तसेच क्रीडा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
000000
Comments
Post a Comment