*विवेकानंद विद्यालयात व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम*

*विवेकानंद विद्यालयात व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम*

अतुल कोल्हे भद्रावती :- 
                स्थानिक विवेकानंद माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये विविध व्यसनांच्या परिणामांविषयी जागृती व्हावी या उद्देशाने दिनांक 07 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त व्यसनमुक्ती सप्ताह अंतर्गत स्वीकार व्यसनमुक्ती केंद्र, दुर्गापूर, चंद्रपूर आणि समाज कल्याण विभाग, जि. प. चंद्रपूर यांचे संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षिका कल्पना ठावरी, प्रमुख मार्गदर्शक स्वीकार व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक व समुपदेशक तुलसीदास शहारे आणि प्रमुख अतिथी अरुण रुद्रकार मंचावर उपस्थित होते.
महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व मान्यवरांच्या स्वागतानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. 
प्रमुख मार्गदर्शक तुलसीदास शहारे यांनी विविध व्यसने, ती व्यसन लागण्याची कारणे, त्या व्यसनांमूळे होणारे विविध स्तरांवरील नुकसान आणि स्वतःला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी घ्यावयाची काळजी यांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
अन्य प्रमुख अतिथी अरुण रुद्रकार यांनी आपल्या स्वतःच्या अनुभवातून वाईट सवयीचे व्यसनात कसे रूपांतर होते व त्यात माणूस त्या व्यसनांचा गुलाम बनून स्वतःचे व पर्यायाने स्वतःच्या परिवाराचे कसे नुकसान करून बसतो हे वर्णन केले. व्यसनातून बाहेर पडण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्र कशी मदत करतात, संबंधित व्यक्तीने किंवा कुटूंबाने केंद्राची मदत मिळण्यासाठी काय केले पाहिजे हेही सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा कल्पना ठावरी यांनी वाईट व्यसनांमुळे व्यसनी व्यक्तीच्या शरीराची टप्प्याटप्प्याने कशी हानी होत जाते हे सोप्या शब्दांत विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
किशोरवयीन विद्यार्थ्यांत इतरांकडे बघून व्यसनांविषयी कुतूहलातुन आकर्षण कसे निर्माण होते आणि वेळीच काळजी घेतली नाही तर कसे व्यसन लागते हेही समजावून सांगितले.
सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय शांतचित्ताने व मनःपूर्वक संपूर्ण मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाचे संचालन, प्रास्ताविक व आभारप्रदर्शन दयाकर मग्गीडवार यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक संजय आगलावे, पुरुषोत्तम श्रीरामे, आशा मते, केंद्राचे कार्यकर्ते गुलशन रामगिरवार, जितू गुंजेकर, आणि कर्मचारी रामदास ठक, विश्वनाथ हरबडे यांनी विशेष सहकार्य केले.

Comments