*पोस्ट कार्यालयामधून लाडकी बहीण योजनेच्या पैशांचे कमी वाटप :लाभार्थी महिला त्रस्त* *एका दिवसात ५० हजाराच्याच वाटपाचे अधिकार : पोस्ट कार्यालय*

*पोस्ट कार्यालयामधून लाडकी बहीण योजनेच्या पैशांचे कमी वाटप :लाभार्थी महिला त्रस्त*

 *एका दिवसात ५० हजाराच्याच वाटपाचे अधिकार : पोस्ट कार्यालय*

अतुल कोल्हे भद्रावती : 

              पोस्ट कार्यालयामधून शासनाच्या विविध योजनांचे पैसे लाभार्थ्यांनी मागणी केलेल्या पैशांपेक्षा कमी देत असल्याने लाभार्थी त्रस्त आहेत. विशेषत: लाडकी बहिण योजनेत महिला लाभार्थी आहेत. त्यामुळे त्याची झळ महिलांना बसत आहे. 
   अलीकडे शासनाने लाडकी बहीण योजना आणली. प्रत्येक पात्र महिलेला महिना १५०० रुपये देण्यात येत आहे. शासनाच्या सांगण्यानुसार अनेक महिलांनी पोस्ट कार्यालयात आपले खाते काढले. लाभार्थी महिला आपल्या खात्यात आलेले पैसे काढण्याकरीता पोस्ट कार्यालयात गेले असता त्यांनी मागणी केलेले पूर्ण पैसे न देता कमी पैसे दिल्या जात आहे. या पोस्ट ऑफिस मध्ये ग्रामीण भागातील अनेक महिलांनी खाते काढले. त्या सकाळी ९ वाजताच रांगा लावून असतात. पोस्ट कार्यालयास दिवसाला फक्त ५० हजार रुपयांच्या वाटपाचे अधिकार असल्याने अनेक महिलांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. असल्या प्रकाराने लाभार्थी महीला त्रस्त झाल्या आहेत.
    याबाबत पोस्ट खात्याचे प्रभारी अधिकारी गणेश पुलगमवार यांना विचारणा केली असता आम्हाला दिवसाला फक्त ५० हजार रुपयांच्या वाटपाचे अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येकाला थोडी थोडी रक्कम दिल्या जाते. या व्यतिरिक्त पिक विमा योजना आणि इतर योजनांच्या पैशाचे वाटप याच रकमेतून करावे लागत आहे. वाटपाच्या वाढीव रकमेची आम्ही वरिष्ठअधिकारी कडे मागणी केलेली असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments