वरोरा (चंद्रपूर) : यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यात येणाऱ्या बोरी- गोटमार येथील युवकाचा वरोरा शहरालगतच्या रेल्वेरुळानजीक मृतदेह आढळून आला. हा घातपात असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. गुरुदास बंडू नाने असे मृतक युवकाचे नाव आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यात येणाऱ्या बोरी (गोटमार) येथील गुरुदास बंडू नाने (२४) हा युवक शेतमजुरी करीत होता. त्याचे नात्यातीलच एका युवतीशी प्रेमसंबंध होते. ही युवती वरोरा तालुक्यातील माढ़ेळी परिसरातील एका गावातील असून ती महाविद्यालयीन शिक्षणासाठी वरोरा येथे किरायाची खोली घेऊन राहते. ६ जानेवारीला या युवतीला मृतक भेटण्याकरिता गुरुदास वरोरा येथे आला होता. दरम्यान, रात्री घरी न आल्याने पालकांनी आठ वाजताच्या सुमारास गुरुदासशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. तेव्हा त्याने मित्रासोबत असल्याचे सांगून लवकरच घरी येणार असल्याचे सांगितले. दरम्यान, त्यादिवशी रात्री १० वाजताच्या सुमारास गुरुदासने वरोरा येथे राहणाऱ्या आपल्या बहिणीला फोन केला होता. नंतर मात्र त्याचा भ्रमणध्वनी संच प्रतिसाद देत नव्हता. यानंतर ७ जानेवारीला सकाळच्या सुमारास पोलिसांनी गुरुदासच्या नातेवाइकांना फोन करून त्याचा मृतदेह मिळाल्याची माहिती दिली.
हा मृतदेह वरोरा-नागपूर या दोन रेल्वेलाइनच्या मध्ये चिनोरा परिसरात आढळून आल्याचे सांगितले जाते. सदर मृतदेह पोलिसांना ६ जानेवारीच्या मध्यरात्रीनंतर ७ जानेवारीच्या पहाटे दोन वाजताच्या सुमारास आढळून आला. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. त्याचा भ्रमणध्वनी पोलिसांच्या ताब्यात असून कॉल डिटेल्स आणि शवविच्छेदन अहवालातून पोलिसांना पुढील तपास व कारवाईची दिशा मिळणार आहे. गुरुदासने आत्महत्या केली की, हा घातपात आहे, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहे. प्रेमप्रकरणातून त्याची हत्या तर झाली नसावी ना, असाही संशय कुटुंबीयांकडून व्यक्त केला जात आहे.
-------------------------------------------
गुरुदास नाने प्रकरणात
लोको पायलटची भूमिका महत्त्वाची
रेल्वेरूळावर अपघात झाला किंवा मृतदेह आढळून आला, याची माहिती प्रथमदर्शनी त्या रुळावरून धावणाऱ्या रेल्वेच्या चालकाला होते. ती माहिती तो जवळच्या रेल्वेस्टेशनला देत असतो. त्यामुळे सदर प्रकरणात रेल्वे अपघात किंवा आत्महत्येचा प्रकार असल्यास रेल्वेचालक अर्थात लोको पायलटला याची माहिती असू शकते. त्यामुळे त्याची भूमिका या प्रकरणात महत्त्वाची ठरणार आहे.
-----------------------------
Comments
Post a Comment