*क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेतून दिव्यांगाच्या सुप्त कलागुणांना वाव मिळेल - सीईओ विवेक जाॅन्सन*

*क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेतून दिव्यांगाच्या सुप्त कलागुणांना वाव मिळेल - सीईओ विवेक जाॅन्सन*

*दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ*

अकूंश अवथे चंद्रपूर 

चंद्रपूर, दि. 4 : गत तीन वर्षापासून दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळेल, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी व्यक्त केला. पोलीस मुख्यालय ग्राउंड येथे आयोजित दिव्यांगाच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाला प्रभारी पोलिस उपअधीक्षक (गृह) निशिकांत रामटेके, जिल्हा समाज कल्याण अधिकारी धनंजय साळवे, पोलीस निरीक्षक (ग्राउंड)किसन नवघरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक गिरीश धायगुडे, इंडियन रेड क्राॅस सोसायटीचे सचिव डॉ. मंगेश गुलवाडे, गटशिक्षणाधिकारी रवींद्र लहामगे, कैलाश उईके, निलेश पाझारे आदी उपस्थित होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जाॅन्सन म्हणाले, दरवर्षी 3 डिसेंबरला 'जागतिक दिव्यांग दिन' साजरा केला जातो. ब्रेल लिपी विकसित करणारे लुई ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  दिव्यांगाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग कार्यान्वित करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.
तसेच चंद्रपूरमध्ये जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र (DDRC) सुरू करण्यात येत आहे. दिव्यांग बांधवांचा बहुआयामी म्हणजेच, सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्वरूपात विकास करण्यासाठी पावले टाकली जात आहे. शाळेत जाऊ न शकणाऱ्या दिव्यांग बांधवांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांची आरोग्य तपासणी करून प्रमाणपत्र आणि शासकीय योजनांचा लाभ देण्यात येत असून दिव्यांगाचा सर्वांगीण विकास व सक्षमीकरणासाठी समाज कल्याण विभागाने एक पाऊल पुढे टाकले आहे. 

दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्य असतात. शिक्षकांनी त्यांचे कौशल्य ओळखून व्यावसायिक प्रशिक्षण द्यावे. जेणेकरून, त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणास हातभार लागेल. दिव्यांग बांधवांचे व्यावसायिक कौशल्य वाढविण्यावर भर द्यावा. त्यासाठी लागणारी अपेक्षित मदत समाजकल्याण विभागामार्फत करण्यात येणार असल्याचेही मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले.

रेडक्रॉस सोसायटीचे सचिव डॉ.मंगेश गुलवाडे म्हणाले, जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या माध्यमातून दिव्यांगांच्या कला व सुप्त गुणांना वाव देणारे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. सीईओ विवेक जॉन्सन यांनी दिव्यांगाच्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र कार्यरत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तसेच दिव्यांगाना अशा कार्यक्रमासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

प्रास्ताविकेत बोलताना जिल्हा समाज कल्याण अधिकारी धनंजय साळवे म्हणाले, जागतिक दिव्यांग दिन (3 डिसें.) हा 1992 पासून संयुक्त राष्ट्रांनी प्रोत्साहन दिलेला आंतरराष्ट्रीय दिन आहे. अंधांना प्रेरणा देणारे लुई ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. समाजाच्या आणि विकासाच्या सर्व क्षेत्रात दिव्यांग व्यक्तींचे हक्क आणि कल्याण यांना प्रोत्साहन देणे दिव्यांग व्यक्तींच्या आंतरराष्ट्रीय दिनाचे उद्दीष्ट असल्याचे ते म्हणाले. 

कार्यक्रमाचे संचालन रवींद्र नलगिंटवार तर आभार निलेश पाझारे यांनी मानले. 

*दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा* 
या दिव्यांग क्रीडा स्पर्धेमध्ये सुमारे 300 विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 50 मीटर, 100 मीटर, 200 मीटर धावणे, लांब उडी, गोळा फेक, स्पाॅट जंप, बुद्धीबळ यासह विविध स्पर्धा घेण्यात येत आहे.

Comments