सावित्रीबाई फुले यांचा लढा स्त्रीशिक्षणाचे प्रेरणास्त्रोत - आ. किशोर जोरगेवार**सावित्रीबाई फुले शाळेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी*,
*सावित्रीबाई फुले शाळेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी*
, अकूंश अवथे चंद्रपूर
सावित्रीबाई फुले यांनी आपल्या आयुष्यभर समाजातील रूढी-परंपरांविरोधात लढा दिला आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजाला नवी दिशा दिली. त्यांनी स्त्रिया आणि मागासवर्गीयांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे ऐतिहासिक कार्य केले. त्या काळातील प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी हिम्मत न हारता, शिक्षणाचा दिवा पेटवत ठेवला. त्यांचा हा लढाच स्त्रीशिक्षणाचे प्रेरणास्त्रोत असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
बाबुपेठ येथील महानगर पालिकेच्या सावित्रीबाई फुले शाळेत सावित्रीबाई फुले जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त विपिन पालीवाल, जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी अश्विनी सोनवने, मुख्याध्यापक नागेश निट, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कुंदा बावणे, उपाध्यक्ष राधा चिंचोळकर, माजी नगरसेवक प्रदिप किरमे, रुपेश पांडे, अमोल नालमवार आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, आज सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत असताना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार मार्गदर्शक ठरतात. त्यांनी महिलांसाठी शिक्षणाचे दार खुले केले. आज महिला केवळ शिक्षितच झाल्या नाहीत, तर प्रत्येक क्षेत्रात पुढे गेल्या आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून आमचीही जबाबदारी असून मुली शिकाव्यात, त्यांना शिक्षण क्षेत्रात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. अनेक गरजू विद्यार्थिनींना आपण सायकल वितरित केली आहे. पुढेही हा उपक्रम सुरू राहणार असून गरजू विद्यार्थिनींना शाळेत येण्यासाठी सायकलचे वितरण करणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.
आजही त्यांच्या विचारांची आणि कार्याची प्रेरणा आपल्याला समानतेचा आणि शिक्षणाचा मार्ग दाखवते. आपण सर्वांनी सावित्रीबाईंच्या विचारांना आत्मसात करून शिक्षणाच्या माध्यमातून समाजाची उन्नती साधावी, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे ते यावेळी म्हणाले. शिक्षणाच्या क्षेत्रात कोणत्याही विद्यार्थ्याला अडथळा येणार नाही. नव्या योजना आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मुलींनी शिक्षणात पुढे जावे, नवे कौशल्य आत्मसात करावे आणि देशाच्या प्रगतीत हातभार लावावा, असे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
यावेळी स्नेहमीलन आणि क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम आमदार किशोर जोरगेवार यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांना अभिवादन केले. या कार्यक्रमाला शिक्षकवृंद, पालकवर्ग आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Comments
Post a Comment