वरोडा : शाम ठेंगडी
वरोडा रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी जवळपास ३५ वर्षांपासून रेल्वे प्रवासी मंडळ, रेल्वे प्रवासी संघ झटत आहे. विविध संघटनेतर्फे वेळोवेळी विविध मागण्यांचे प्रस्ताव जनप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी व केंद्रीय रेल्वेमंत्री यांना पाठवून त्याच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करण्याची विनंती केली गेली. मागील तीन दशकांपेक्षा अधिकचा कालावधी लोटूनही गोरखपूर सुपरफास्ट एक्सप्रेससह अन्य गाड्यांच्या थांब्याची मागणी अद्यापपर्यंत पूर्ण झाली नाही. उलट ज्या गाड्या सुरू होत्या त्या सुद्धा बंद करण्यात आल्या. विशेष म्हणजे राज्यातील विविध रेल्वे स्थानकावर मागणी नसूनही थांबा व अन्य सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मात्र, सन 1877 मध्ये टर्मिनल असलेले वरोडा रेल्वेस्थानक याला अपवाद ठरले आहे. हा दैवदुर्विलास आहे. पुढेही वरोडा स्थानकावर गाड्यांचे थांबे रेल्वे प्रशासन मंजूर करेल असे चिन्ह मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांच्या बोलण्यातून दिसत नाही. कारण जो पर्यंत नवीन रेल्वे लाईन्सचे काम पूर्ण होत नाही, तो पर्यंत वरोडा तसेच जिल्ह्यातील जनतेला प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे दिसून येते. याचाच दुसरा अर्थ असा निघू शकतो की, " न नौ मन तेल होगा, न राधा नाचेगी ". अशी प्रतिक्रिया वरोडा-भद्रावती-चंद्रपूर प्रवासी संघाचे अध्यक्ष राजेंद्र मर्दाने यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ बोलून दाखवली.
Comments
Post a Comment