*कॉपीमुक्त अभियानासाठी जिल्हास्तरीय 8 भरारी पथक*
*चंद्रपूर, दि. 12 :* उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) 11 फेब्रुवारी 2025 पासून सुरू झाली असून जिल्ह्यातील एकूण 87 केंद्रावर सदर परीक्षा घेण्यात येत आहे. पहिल्या दिवशीच दिवशी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील परीक्षा केंद्रास (203) भेट दिली. तसेच परीक्षा केंद्रावरील शिक्षकांना महत्त्वाच्या सूचना केल्या.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, परीक्षा केंद्र परिसरातील सी.सी.टी.व्ही कॅमेरे सुरू असावेत. महाविद्यालयाच्या परिसरात परिक्षेच्या संबंधित व्यक्ती व्यतिरिक्त कुणीही अन्य व्यक्तीस प्रवेश देऊ नये. प्रत्येक पेपर सुरू होण्यापूर्वी प्रवेश द्वारावर विद्यार्थ्यांची योग्य तपासणी करण्यात यावी. तसेच महाविद्यालय परिसरातील झेरॉक्स सेंटर बंद आहेत, याची खात्री करून घ्यावी. परीक्षेत कोणताही गैरप्रकार होणार नाही, याची दक्षता घ्यावी. यावेळेस केद्र संचालक महेश मालेकर, उपकेंद्र संचालक राहूल मानकर व बैठेपथक मधील डी.एस. मोहूर्ले आदी उपस्थित होते.
इयत्ता 12 वी ची परिक्षा 11 फेब्रुवारी ते 11 मार्च तर इयत्ता 10 वी ची परिक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत घेण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात इयत्ता 12 वीचे एकूण 28303 परिक्षार्थी आहेत. तर इयत्ता 10 वीच्या परिक्षार्थींची एकूण संख्या 28174 आहे. 12 वी करीता जिल्ह्यात 87 परीक्षा केंद्र आणि 10 वीच्या परिक्षेकरीता 125 परीक्षा केंद्र आहेत. कॉपीमुक्त परिक्षेसाठी जिल्हास्तरावर 8 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. तसेच तालुका स्तरावर सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील परीक्षा केंद्रांना भेटी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर 3 सदस्यांचे बैठक पथकही ठेवण्यात आले आहे. संवेदनशील परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही ची नजर राहणार आहे. सोबतच परिक्षेकरीता कार्यरत पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदींसाठी ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे.
००००००
**10 वी, 12 वीच्या खेळाडूंची ग्रेस गुण प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने*
*चंद्रपूर, दि.12 :* सन 2024-25 पासून इयत्ता 10 वी आणि इयत्ता 12 वी च्या खेळाडू विद्यार्थ्यांचे ग्रेस गुण अर्ज स्विकारण्याची प्रक्रीया केवळ ‘आपले सरकार प्रणाली’द्वारेच करण्यात येणार आहे. त्यामुळे खेळाडूंचे ग्रेस गुण सर्व शाळांनी व मुख्याध्यापकांनी ऑनलाईन पध्दतीनेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडे पाठवावे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.
यापुर्वी सन 2023-24 पर्यंत दरवर्षी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय हे जिल्ह्यातील सर्व शाळांकडून 10 वी व 12 वीच्या खेळाडू विद्यार्थ्यांचे ऑफलाईन अर्ज मागवित होते, व अर्जाची तपासणी करून बोर्डाला त्यांचे ग्रेस गुण कळवित होते. परंतु सन 2023-24 पर्यंतच्या ग्रेस गुण प्रक्रियेचे काम काही मानवी उणीवांमुळे अचुक व दोषविरहीत होण्यात अडचण होत होती व त्याचा फटका खेळाडू विद्यार्थ्यांना गुण न मिळाल्याने बसत होता. त्यामुळे या प्रश्नावर तोडगा व सवलत गुण प्रक्रिया निर्दोष करण्यासाठी या वर्षीपासून ग्रेस गुणांसाठी केली जाणारी प्रक्रिया केवळ आपले सरकार पोर्टलद्वारेच ऑनलाईन पध्दतीने करण्यात आली आहे.
सर्व अर्ज आपले सरकार प्रणालीद्वारे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळ यांच्याकडे सादर करण्याची सुविधा निर्माण करून देण्यात आलेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडू विद्यार्थी/ सर्व माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी आपले सरकार ॲपद्वारे या वर्षीपासून सवलत गुणांचा अर्ज महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळ यांच्याकडे सादर करावा. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर
सदर अर्ज स्विकारणार नाही. खेळाडू विद्यार्थ्यांना ग्रेस गुण देण्याच्या कामात खेळाडूंचे नुकसान झाल्यास सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांची राहील. त्यामुळे शाळांनी आपले सरकार या खेळाडूंसाठीच्या ऑनलाईन प्रक्रियेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पूंड यांनी सर्व शाळा आणि खेळाडूंना केले आहे.
००००००००
Comments
Post a Comment