*राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत 3782 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी*

*राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत 3782 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी*

चंद्रपूर, दि. 02 मार्च : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील एकूणध्‍ 3782 शालेय विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. 
शनिवारी या कार्यक्रमाचे राज्यस्तरावरून दूरदृष्यप्रणालीद्वारे तर जिल्हास्तरावर बाबुपेठ येथील पी.एम. श्री. सावित्रीबाई फुले प्रा. उच्च शाळा येथे मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन महानगरपालिका आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, मनपाच्या वैद्यकिय अधिकारी डॉ. नयना उत्तरवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. पराग जिवतोडे आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत 0 ते 18 वयोगटातील बालकांची सखोल आरोग्य तपासणी करून जन्मजात विकृती, बालपणातील आजार, जिवनसत्वाची कमतरता, विकासातील विलंब, किशोरवयीन स्वास्थ्य यावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले. बाल स्वास्थ कार्यक्रम हा बालकांच्या उज्वल भविष्यासाठी महत्वाचा टप्पा असून सर्व संबंधित विभागांनी या उपक्रमात सहभाग घ्यावा. तसेच प्रत्येक बालकांची आरोग्य तपासणी करून बालकांना निरोगी बालपण द्यावे, आवाहन मान्यवरांनी केले. यावेळी जिल्ह्यातील सर्व तालुक्यात वैद्यकिय पथकांमार्फत विविध शाळा व अंगणवाड्यांमध्ये बालकांची आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून सदर मोहिमेमध्ये मोफत उपचार, मोफत संदर्भसेवा व मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
चंद्रपुर जिल्हयातील 15 तालुक्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे उद्घाटन करून 3782 शालेय बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या दरम्यान 275 बालकांवर शाळेतच उपचार करण्यात आले असून 216 बालकांना पुढील उपचाराकरिता तज्ञ डॉक्टरांकडे संदर्भीत करण्यात आले आहे. आरोग्य तपासणी सोबतच राष्ट्रीय सिकसेल नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत शाळेतील बालकांची सिकलसेल आजाराची तपासणी करण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन योगिता आंबेकर यांनी तर आभार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी मानले. कार्यक्रमाला मेट्रन माया आत्राम, शाळेचे मुख्याध्यापक नागेश नीत, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम पथक, आरोग्य कर्मचारी, शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि पालक उपस्थित होते. 
०००००

Comments