वरोरा
फक्त बातमी
समाजसेवा ही केवळ राजकीय संघटनांपुरती मर्यादित राहिली पाहिजे, असे नाही. निःस्वार्थ सेवा करण्यासाठी कोणत्याही पदवी किंवा विशेष ओळखीची गरज नसते—फक्त इच्छाशक्ती आणि कृतिशीलता आवश्यक असते. हीच प्रेरणा घेऊन काही तरुण एकत्र आले आणि समाजसेवेच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल उचलले. हिंदू संस्कृतीच्या मूल्यांचे रक्षण करणे, गोरक्षण करणे, पर्यावरण संवर्धन करणे, गरजूंच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहणे आणि सामाजिक एकता मजबूत करणे हे या तरुणांचा उद्देश आहे.
गाय हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा घटक आहे. मात्र, आज अनेक ठिकाणी गाईंची दुर्दशा होताना दिसते. या युवकांनी गाईंच्या संरक्षणासाठी गोरक्षण केंद्रांना मदत करणे, जखमी वा असहाय्य गाईंना तसेच इतरही प्राणी म्हणजे कुत्रा, मांजर, साप तसेच वन्यप्राणी यांना उपचारात मदत करणे, निवारा देणे आणि जनजागृती मोहिमा राबवणे असे उपक्रम सुरू केले आहेत. समाजात गोरक्षणाची जाणीव निर्माण करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
निसर्ग आणि पर्यावरण जतन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. याच विचाराने प्रेरित होऊन या युवकांनी वृक्षारोपण, जखमी प्राण्यांना मदत, त्यांना योग्य उपचार, तसेच त्यांचे पुनर्वसन आणि स्वच्छता अभियान राबवण्यास सुरुवात केली. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक गावांमध्ये व शहरी भागात स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण झाली आहे.
शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत गरजा प्रत्येकाला सहज मिळाल्या पाहिजेत. अनेक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप यासाठी हे युवक विशेष प्रयत्न करीत आहेत. तसेच, रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी मोहीमा आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित करून समाजातील आरोग्यविषयक समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याचे काम हे करत आहेत.
हिंदू संस्कृती ही केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक बंधुभावाचे प्रतीक आहे. परंपरांचे जतन करत नव्या पिढीपर्यंत त्या पोहोचवणे, सण-उत्सव एकत्र येऊन साजरे करणे आणि समाजात हिंदू संस्कृतीची ओळख निर्माण करणे या गोष्टींवर हा युवा गट भर देत आहे. हिंदू संस्कृतीनुसार जे सण साजरे केले जातात त्यांना समाजातून सर्व युवक एकत्र येत भव्य दिव्य स्वरूप देत, मोठ्या मिरवणूका आयोजित करणे तसेच धार्मिक स्थळांचे देखावे सादर केल्या जात आहे. त्यांचा उद्देश समाजातील एकता वाढवणे आणि परस्पर सन्मानाच्या तत्त्वावर पुढे जाणे आहे. तसेच आपल्या भागातील युवकांमध्ये गडकिल्याविषयी आत्मीयता वाढावी त्यांना आपला इतिहास समजावा आणि योग्य ती शिस्त वाढावी म्हणून गडकिल्यांवर आयोजित केल्या जाणाऱ्या मोहिमांमध्ये विशेष सहभाग घेतल्या जातो.
या गटातील प्रत्येक सदस्य आपापल्या परीने समाजाच्या भल्यासाठी कार्य करत आहे. सतीश निर्बाण, विजय जुनघरे, आकाश काकडे, क्रिष्णा चौरसिया, बंटी खडके, ईश्वर ठाकरे, अविनाश मांदाळे, राकेश जेऊरकर, शुभम गोल्हर, शुभम पर्बत आणि चेतन जीवतोडे हे सर्व युवक समाजासाठी काहीतरी चांगले करण्याच्या इच्छेने प्रेरित आहेत प्राणीप्रेमाबद्दलचे त्यांचे कार्य विशेष प्रशंसनीय आहे. त्यांचा सहभाग आणि समर्पण समाजसेवेसाठी आदर्श ठरत आहे.
हे युवक आणखी मोठ्या प्रमाणावर समाजासाठी कार्य करण्याचा निर्धार करत आहेत. नवीन गोरक्षण केंद्रांची स्थापना, गरीब विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, अधिक मोठ्या प्रमाणावर स्वच्छता आणि वृक्षारोपण उपक्रम राबवणे या त्यांच्या भावी योजना आहेत. समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी ते आपले योगदान पुढेही देत राहणार आहेत.
कुठलीही संस्था किंवा आर्थिक पाठबळ नसतानाही केवळ सेवा, संस्कृती आणि समर्पण या मूल्यांवर उभा असलेला हा युवा गट समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्यातून समाजसेवा म्हणजे केवळ एक जबाबदारी नसून, ती एक जीवनशैली कशी असू शकते, याचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.
*त्यांच्या सामाजिक बांधिलकीला आणि कार्याला सलाम!*
Comments
Post a Comment