घरमालक दाम्पत्याशी झालेल्या वादातून अपमान सहन न झाल्याने महिलेची आत्महत्या

घरमालक दाम्पत्याशी झालेल्या वादातून अपमान सहन  न झाल्याने महिलेची आत्महत्या

वरोरा : वरोरा शहरात शुल्लक वादातून महिलेने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला.
घरमालकाच्या त्रासाला कंटाळून दुसऱ्या ठिकाणी राहायला गेलेल्या दाम्पत्याशी जुन्या घरमालकाने वाद घालून जीवे मारण्याची धमकी दिली. या भांडणात अपमान सहन न झाल्याने महिलेने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना ५ मार्चला उघडकीस आली असून याप्रकरणी जुने घरमालकांच्या कुटुंबीयातील पाच व्यक्तींना अटक केली.

वरोरा शहरालगतच्या बोर्डा ग्रामपंचायत हद्दीतील रामवाटिका वसाहतीत संतोष दिलीप मांडवकर व त्यांची पत्नी रीना किरायाने राहत होते. ५ मार्च रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास संतोष मांडवकर दुकानातील काम आटोपून जेवण करायला घरी गेले असता, त्यांची पत्नी रीना (२७) ही पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेली दिसली. ही माहिती त्यांनी नातेवाईक व पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. दरम्यान, रीनाने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी पती संतोष व पोलीस यांच्या हाती लागली.

एकाच कुटुंबातील पाच जणांना अटक
त्यातील लिहिलेल्या मजकुरावरून रीनाने ४ मार्च रोजी जुन्या घरमालक दाम्पत्यांसोबत झालेल्या वादातून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. यामुळे रीनाचा पती संतोष दिलीप मांडवकर यांनी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशन गाठून जुन्ऱ्या दाम्पत्यासह मुलगी, मुलगा व सून यांच्या विरोधात तक्रार देऊन रीनाच्या आत्महत्येला हे सर्व जबाबदार असल्याचा आरोप केला.
संतोषने तक्रारीत म्हटल्याप्रमाणे तो व पत्नी रिना बोर्डा परिसरातील मधुकर धोके यांच्या घरी किरायाने राहत होते. परंतु, घरमालकांसोबत वारंवार वाद होत असल्याने त्यांनी २० फेब्रुवारीला सदर घर सोडून बोर्डा ग्रामपंचायत हद्दीतील रामवाटिका वसाहतीत किरायाने घर घेतले. यानंतर ४ मार्चला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास जुने घरमालक मधुकर ढोके व त्यांची पत्नी, मुलगी यांनी तिथे येऊन भांडण केले आणि जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर मधुकर ढोके यांचा मुलगा धीरज व त्याची पत्नीने फोनवरून आणखी भांडण उकरून काढून रीनाला अपमानित केले. त्यामुळे रीना ने आत्महत्या केली असा आरोप संतोष मांडवकर यांनी केला आहे या तक्रारीवरून पोलिसांनी मधुकर ठोके यांची पत्नी व मुलगी मुलगा धीरज धोके व त्यांची पत्नी अशा पाच जनावर भारतीय दंड संहिता 2023 च्या कलम 108,352,351,(२),351(4),3(5) अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस करित आहे.

Comments